लॉकडाऊन असला तरी पोषण आहाराचे वाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST2021-03-14T04:07:35+5:302021-03-14T04:07:35+5:30
नागपूर : नागपूर जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी १५ ते २१ मार्च या कालावधीत लॉकडाऊन घोषित केला. ...

लॉकडाऊन असला तरी पोषण आहाराचे वाटप करा
नागपूर : नागपूर जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी १५ ते २१ मार्च या कालावधीत लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊनच्या बाबतीत दोन्ही प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्यानंतरही महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षकांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यासंदर्भात शाळेत बोलाविण्याचे पत्र मुख्याध्यापकांना दिले आहे. पत्रात त्यांनी उच्च न्यायालयाचा संदर्भ देत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे निर्देश दिले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या या पत्रामुळे मुख्याध्यापकांनीही शिक्षकांना शाळेत बोलाविले. एका शाळेने तर विद्यार्थ्यांनाही पोषण आहार घेण्यासाठी शाळेत बोलाविल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. शिक्षणाधिकारी मिश्रीकोटकर यांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट केले की शाळा बंद ठेवण्याचे निर्देश आहे. परंतु या कालावधीत धान्यादी मालाचा पुरवठा सुरू राहील. पुरवठादार मुख्याध्यापकांशी संपर्क साधून पुरवठ्याचा दिनांक कळवतील. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी धान्यादी मालाची उचल करावी. शिवाय उच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये ३१ मार्च २०२१ पर्यंत धान्य वाटप करणे बंधनकारक आहे. त्यामुळे न्यायालयाची अवमानना होणार नाही, याची दक्षता घ्यावी. या पत्रानुसार मुख्याध्यापकांनी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांना घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे धान्य वाटप करायचे आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या या पत्रामुळे शिक्षकांंनी नाराजी व्यक्त केली आहे.