जि. प. शाळांतील ५०० च्या आसपास वर्गखोल्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST2021-06-27T04:06:23+5:302021-06-27T04:06:23+5:30
नागपूर : कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी शाळांची दुरुस्ती व वर्ग खोल्यांचे बांधकाम होऊ शकले ...

जि. प. शाळांतील ५०० च्या आसपास वर्गखोल्या धोकादायक
नागपूर : कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी शाळांची दुरुस्ती व वर्ग खोल्यांचे बांधकाम होऊ शकले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे २१५ वर्गखोल्यांचे बांधकामाचे व २८४ वर्गखोल्या दुरुस्तीचे प्रस्ताव आले आहेत. जिल्हा परिषदेने वर्गखोली बांधकामासाठी १४ कोटी व दुरुस्तीसाठी ६ कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला होता. त्यासाठी १२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे शाळांची स्थिती बघूनच वर्गखोली बांधकामाला प्राधान्य देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या १५३० शाळा आहेत. जवळपास ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती, वर्ग खोल्या बांधकाम हे दरवर्षी निघते. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती, खनिज प्रतिष्ठान व समग्र शिक्षा अभियानातून निधी दिला जातो. जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा किमान २० वर्षे जुन्या आहेत. कारण गेल्या १५ ते २० वर्षापासून जिल्हा परिषदेची शाळा सुरूच झाली नाही. इमारतीचे बांधकाम जुने असल्याने दरवर्षी दुरुस्ती व वर्ग खोल्यांचे बांधकाम निघत असते. यावर्षी नवीन वर्गखोल्या बांधकाम व दुरुस्तीसाठी अनुक्रमे २१५ व २८४ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आले आहेत. जिल्हा नियोजन समितीने नवीन वर्ग खोल्या बांधकामासाठी १२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तर दुरुस्तीसाठी ५ कोटीच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून जवळपास १०५ वर्गखोल्यांचे बांधकाम होईल. त्यामुळे प्राधान्याने गरज असलेल्या शाळांना वर्गखोली बांधकामासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
वर्गखोल्याबरोबर शौचालयाचे बांधकाम
२००९ मध्ये शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शौचालय बांधून दिले होते. पण शौचालयांचे बांधकाम अतिशय निकृष्ट करण्यात आले. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शौचालय नादुरुस्त आहेत. शौचालय बांधकामासाठी विशेष निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेने नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामाबरोबरच शौचालय बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निधी वाढवून दिला आहे. बांधकामाचे टेंडर काढताना वर्गखोल्यांच्या बांधकामाबरोबर शौचालयाच्या बांधकामाची अट घालण्यात येणार आहे.
भारती पाटील, शिक्षण सभापती, जि.प.