इथेनॉल बसच्या मार्गात अडथळा !
By Admin | Updated: August 9, 2014 02:27 IST2014-08-09T02:27:57+5:302014-08-09T02:27:57+5:30
राज्य परिवहन विभागाच्या नियमात बससाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनात पेट्रोल व डिझेलचाच उल्लेख आहे.

इथेनॉल बसच्या मार्गात अडथळा !
नागपूर : राज्य परिवहन विभागाच्या नियमात बससाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनात पेट्रोल व डिझेलचाच उल्लेख आहे. यात इथेनॉलचा समावेश नाही. त्यामुळे शहरात प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या इथेनॉल बसच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.परिवहन विभागाच्या नियमात केंद्र शासनाने सुधारणा केल्याशिवाय शहरात इथेनॉलवरील बस धावणार नसल्याचे शुक्र वारी मनपाच्या परिवहन समितीच्या बैठकीत स्पष्ट झाले. स्वीडनकडून मनपाला इथेनॉलवर चालणाऱ्या पाच बसेस मिळणार आहे. यातील पहिली बस नागपुरात आली आहे. परंतु तांत्रिक बाबींची पूर्तता केल्याशिवाय ती शहरातील मार्गावर चालविता येणार नाही. यासाठी मनपाच्या परिवहन विभागाने प्रयत्न चालविले आहे.
स्वीडनची स्कॅनिया कंपनीने तीन महिनेच ही बस चालविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानंतर ती मनपातर्फे चालविली जाणार आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या बसला आरटीओकडून परवाना देण्यात तांत्रिक अडचणी आहेत.
यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे ही बस चालविण्यासाठी मनपाला काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. नियमात सुधारणा झाल्यानंतर आॅगस्ट अखेरीस आरटीओकडून मंजुरी मिळेल. त्यानंतर ही बस धावणार असल्याचे परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून इथेनॉलवर चालणारी बस आली आहे. देशात सर्वप्रथम नागपूर शहरात प्रायोगिक तत्त्वावर बस धावणार आहे. (प्रतिनिधी)