काँग्रेसमध्ये असंतुष्टांचा भडका

By Admin | Updated: February 5, 2017 02:18 IST2017-02-05T02:18:19+5:302017-02-05T02:18:19+5:30

ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेतील बंडखोरांना उमेदवारी जाहीर करणाऱ्या आपल्या नेत्यांविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला.

Dissatisfaction in the Congress | काँग्रेसमध्ये असंतुष्टांचा भडका

काँग्रेसमध्ये असंतुष्टांचा भडका

नारेबाजी व निदर्शने : काहींनी सोडला पक्ष
नागपूर : ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेतील बंडखोरांना उमेदवारी जाहीर करणाऱ्या आपल्या नेत्यांविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला. नेत्यांविरुद्ध ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. काहींनी पक्षातील आपल्या पदाचे राजीनामे देत असल्याचे जाहीर केले.(प्रतिनिधी)

मोमीनपुरात निदर्शने, पुतळा दहन
काँग्रेस कार्यकर्ते पदधिकाऱ्यांनी मोमीनपुरा चौकात शनिवारी रात्री १० वाजता निदर्शने केली. या कार्यकर्त्यांनी शहर काँग्रेस कमिटी आणि मध्य नागपूरचे आमदार राहिलेले अनिस अहमद यांच्या विरुद्ध नारेबाजी करीत आपला निषेध व्यक्त केला. निदर्शनादरम्यान पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी तिकीट वाटप करताना हलबा व तेली समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. सामान्य वर्ग व ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या जागांबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. निदर्शनात शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशरफ खान, माजी उपमहापौर अब्दुल लतीफ, इरफान कपूर, माजी नगरसेवक शमीम अख्तर भादा, ललिता धापोडकर, रम्मू अन्सारी, माजी नगरसेवक अशरफु न्निसा इफ्तेखार अन्सारी, मुख्तार अन्सारी, शकील अहमद पप्पूभाई आदींचा समावेश होता.

हिवरी नगरात नारेबाजी
पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक २६ व २३ मधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या विरुद्ध भीम चौक हिवरीनगर येथे निदर्शने केली. तिकीट वाटपात भेदभाव झाल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप होता. हरीश रामटेके, शुभम मोटघरे, रवि बोरकर आणि विनोद मंडपे यांनी निदर्शनाचे नेतृत्व केले. प्रभाग २६ मधून दुसऱ्या पक्षातून आलेल्या बंडखोरांना तिकीट देण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता. निदर्शकांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या विरोधात नारेबाजी केली. संगीता वालदे, संघपाल मेश्राम, गोपाल शेंडे, कमल जोशी, रमेश अंबर्ते, सलीम खान आदींचा यात समावेश होता.

Web Title: Dissatisfaction in the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.