४ झोन मधील वस्त्यांचा पाणीपुरवठा विस्कळीत
By मंगेश व्यवहारे | Updated: September 16, 2023 18:26 IST2023-09-16T18:25:53+5:302023-09-16T18:26:18+5:30
पेंच नदी क्षेत्रात संततधार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच नदीवरील तोतलाडोह आणि नवेगाव खैरी धरण पूर्णपणे भरले असून, तोतलाडोह धरणाचे १४ पैकी १० तसेच नवेगाव खैरीचे सर्व १६ दरवाजे उघडण्यात आले आहे.

४ झोन मधील वस्त्यांचा पाणीपुरवठा विस्कळीत
नागपूर : कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून ४ झोनला पाणी पुरवठा होतो. परंतु कन्हान नदीला आलेल्या पुरामुळे इनटेक वेल (विहीर) संपूर्णपणे नदीच्या पुरात बुडाली असून, गाळ आणि कचऱ्यामुळे पाण्याच्या पंपींगवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आशीनगर, सतरंजीपुरा, लकडगंज, नेहरूनगर झोन अंतर्गत येणाऱ्या वस्तींमध्ये कमी दाबाने किंवा अत्यंत मर्यादित तर काही ठिकाणी पाणी पुरवठा पूर्णत: बाधित राहण्याची शक्यता आहे.
पेंच नदी क्षेत्रात संततधार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच नदीवरील तोतलाडोह आणि नवेगाव खैरी धरण पूर्णपणे भरले असून, तोतलाडोह धरणाचे १४ पैकी १० तसेच नवेगाव खैरीचे सर्व १६ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामधून प्रचंड पाण्याचा विसर्ग पेंच नदी तसेच कन्हान नदी मध्ये सुरु आहे. कन्हान नदीमध्ये आधीच मुसळधार पावसामुळे नदीपात्रात वाढ झाली होती, धरणाचे दरवाजे उघडल्याने पाण्याची पातळी २७६ मीटर ऐवढी वाढली आहे. त्यामुळे कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचे इनटेक वेल ( विहीर) संपूर्णपणे नदीच्या पुरात बुडाली असून , पुरातील गाळ आणि कचरा यामुळे चोक झालेली आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याचे पम्पिंग फक्त ७० टक्केच करू शकत आहे.
सध्या कन्हान नदीचे पुराचे पाणी जॅक वेल स्ट्रक्चरच्या जवळपास २५ फूट वरून वाहत आहे. या सर्व परिस्थितीमुळे कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावरून आधारित आशीनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि नेहरूनगर झोन मधील जलकुंभातून पाणी पुरवठा कमी दाबाने, मर्यादित किंवा काही भागात पूर्णपणे बाधित राहण्याची शक्यता आहे.