टाकळीतील टोलनाक्याविरुद्धची याचिका खारीज
By Admin | Updated: June 11, 2015 02:44 IST2015-06-11T02:44:54+5:302015-06-11T02:44:54+5:30
नागपूर-बैतूल रोडवरील पाटणसावंगी येथून टाकळी येथे स्थानांतरित करण्यात आलेल्या टोलनाक्याविरुद्धची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...

टाकळीतील टोलनाक्याविरुद्धची याचिका खारीज
नागपूर : नागपूर-बैतूल रोडवरील पाटणसावंगी येथून टाकळी येथे स्थानांतरित करण्यात आलेल्या टोलनाक्याविरुद्धची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यापक जनहित व गुणवत्ता नसल्याचा निष्कर्ष नोंदवून फेटाळून लावली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी बुधवारी हा निर्णय दिला.
विनोदकुमार जैन व इतर चौघांनी ही याचिका दाखल केली होती. टाकळी गाव नागपूरपासून केवळ २५ किलोमीटर अंतरावर आहे. नियमानुसार नागपूरपासून ५० किलोमीटर अंतरावर टोलनाका उभारता येत नाही. ३० आॅगस्ट २०१० रोजी रोडचे बीओटी तत्त्वावर चौपदरीकरण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ओरिएंटल नागपूर-बैतूल हायवे कंपनी यांच्यात करार झाला आहे. या महामार्गावर मुलताई व बैतूल बायपास येथे आधीच टोल नाके आहेत. तसेच, टाकळी येथे टोलनाका उभारण्याचा निर्णय घेताना राष्ट्रीय महामार्ग कायदा-१९५६ व राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निश्चित करणे व वसुली) नियम-२००८ मधील तरतुदींचे उल्लंघन झाले असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. महेश धात्रक तर, प्राधिकरणतर्फे अॅड. अनिश कठाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)