नागपुरातील केंद्रीय प्रवेश समिती बरखास्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST2021-07-28T04:07:36+5:302021-07-28T04:07:36+5:30
नागपूर : महापालिकेच्या हद्दीत अकरावीची प्रवेश प्रक्रिया आयोजित करणारी केंद्रीय प्रवेश समिती बरखास्त करावी, अशी मागणी शिक्षण संस्था महामंडळाने ...

नागपुरातील केंद्रीय प्रवेश समिती बरखास्त करा
नागपूर : महापालिकेच्या हद्दीत अकरावीची प्रवेश प्रक्रिया आयोजित करणारी केंद्रीय प्रवेश समिती बरखास्त करावी, अशी मागणी शिक्षण संस्था महामंडळाने शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. कारण शिक्षण विभागाच्या सहसचिवांनी औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीतील केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून होणारी प्रवेश प्रक्रिया रद्द केली आहे.
राज्यातील नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती व औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत व मुंबईच्या एमएमआरडीए क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून करण्यात येते; परंतु यावेळी औरंगाबाद महापालिका हद्दीतील अकरावीची प्रवेश प्रक्रिया समितीच्या माध्यमातून करण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाचे सहसचिव यांनी शिक्षण संचालक पुणे यांना निर्देश दिले आहेत. यामागची कारणमीमांसा लक्षात घेतल्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमुळे औरंगाबादमधील कॉलेजमध्ये अकरावीच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहत होत्या. त्यामुळे औरंगाबादच्या शिक्षण उपसंचालक यांनी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत होणारी प्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविला होता.
औरंगाबादसारखीच परिस्थिती नागपूरचीसुद्धा आहे. नागपूर महापालिकेच्या हद्दीतील ज्युनि. कॉलेजमध्ये गेल्या सत्रात अकरावीच्या ५९ हजार जागांपैकी २४ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. तसेच गेल्या तीन सत्रापासून अकरावीच्या रिक्त जागांची संख्या वाढतच असल्याने शिक्षण संस्था महामंडळाकडून केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून होणारी प्रवेश प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
- राज्याची पॉलिसी ठरविताना कुठल्याही एका महापालिकेची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यापेक्षा हा निर्णय सरसकट राज्यासाठी लागू करावा. त्यासाठी आम्ही शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
-रवींद्र फडणवीस, सचिव, राज्य शिक्षण संस्था महामंडळ