भोंदू मांत्रिकाची रवानगी कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:09 IST2021-01-19T04:09:51+5:302021-01-19T04:09:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भूतबाधेचा धाक दाखवून उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसह चार जणींवर बलात्कार करणाऱ्या भोंदू मांत्रिकाची कारागृहात ...

भोंदू मांत्रिकाची रवानगी कारागृहात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूतबाधेचा धाक दाखवून उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसह चार जणींवर बलात्कार करणाऱ्या भोंदू मांत्रिकाची कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, लोकमतमध्ये वृत्त आल्यानंतर पारडीतील नागरिकांनी धर्मेंद्र विठोबा निनावे ऊर्फ दुलेवाले बाबा (वय ५०) नामक नराधमाच्या विरोधात संताप व्यक्त केला.
अंगात येण्याचा बनाव करून निनावेने आपल्या घरीच दरबार बनवला आहे. देवीदेवतांचे फोटो लावून तेथे तो अशिक्षित महिला-मुली आणि पुरुषांना गंडेदोरे देत होता. अंगारेधुपारे करून भूतबाधा झालेल्यांवर उपचार करण्याचाही दावा करीत होता. पारडीतीलच एका १७ वर्षांच्या मुलीला भयंकर भूतबाधा झाल्याचे सांगून त्याने उपचाराच्या नावाखाली तिच्या कुटुंबीयांवर जाळे टाकले होते. गुंगीचे औषध देऊन, रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी नेऊन तो ‘पूजा विधीच्या नावाखाली’ मुलीवर बलात्कार करू लागला. तुझ्या अंगातील भूत पळवायचे आहे त्यामुळे तू कुणाला या विधीबद्दल सांगितले तर तुझ्या कुटुंबातील सर्व जणांना भूत ठार मारेल, अशी भीती भरवून त्याने मुलीला गप्प केले होते. एक दिवस त्याने मुलीच्या आईवर, नंतर मुलीच्या मामीवर आणि त्यानंतर या नराधमाने मुलीच्या ६० वर्षीय आजीवरही बलात्कार केला. कुणाला याबाबत काही सांगितल्यास तुमच्या कुटुंबावर भयंकर संकट येईल आणि सर्व जण ठार होतील, अशी भीती त्याने पीडित महिलांच्या मनात भरवली होती. बलात्कार करतानाच त्याने अलीकडे पीडितांना उपचारासाठी पैशाची मागणी केल्याने पीडित महिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पारडी पोलिसांनी त्याला अटक करून त्याची १० दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याची वाढीव कोठडी मिळावी अशी मागणी केली. परंतु न्यायालयाने ती फेटाळून या नराधमाला कारागृहात पाठविण्याचे निर्देश दिले. दरम्यान, नराधम निनावेच्या पापाचा बोभाटा झाल्याने नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
---
नराधमाचे पाप अंधारात
नराधम निनावे त्याच्या घरी दरबार भरवून भोळ्याभाबड्या महिला-मुलींसोबत उपचाराच्या नावाखाली चाळे करीत होता. त्यामुळे त्याने अनेकींवर अत्याचार केला असावा, असा दाट संशय आहे. परंतु या प्रकरणाबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगल्याने एवढे दिवस नराधमाचे पाप चव्हाट्यावर आले नाही. त्याचमुळे दुसरी कोणतीही पीडित व्यक्ती पुढे आली नाही. आता हा नराधम कारागृहात पोहचल्याने त्याचे पाप अंधारात गडप झाल्यासारखे झाले.
----