चर्चेतून निघेल समाधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 03:12 IST2016-04-20T03:12:35+5:302016-04-20T03:12:35+5:30
दशकभरापूर्वी विदर्भ क्रिकेट असोसिएशन(व्हीसीए)च्या सिव्हिल लाईन्स येथील स्टेडियमवर क्रिकेट सामने खेळल्या जात होते.

चर्चेतून निघेल समाधान!
अभियान : क्रिकेट सामन्याच्या दिवशी वाहतूक ठप्प
नागपूर : दशकभरापूर्वी विदर्भ क्रिकेट असोसिएशन(व्हीसीए)च्या सिव्हिल लाईन्स येथील स्टेडियमवर क्रिकेट सामने खेळल्या जात होते. परंतु हे स्टेडियम लहान होते. त्यामुळे अधिकाधिक क्रिकेटप्रेमींना क्रिकेटचा आनंद घेता यावा, या हेतूने जामठा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम तयार करण्यात आले.
या स्टेडियमच्या आत आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यवस्था करण्यात आली. परंतु स्टेडियमच्या बाहेरील व्यवस्थेत अनेक उणिवा राहिल्या. त्यामुळे येथील क्रिकेट सामन्यांचे आयोजन नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहे. क्रिकेटप्रेमींना या स्टेडियमपर्यंत पोहोचण्यासाठी ट्रॅफिकमधून तासन्तास कसरत करावी लागते; शिवाय सामान्य नागरिकांनासुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ट्रॅफिक जामची समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकदा जामठा स्टेडियमपासून तर थेट नागपुरातील झिरो माईल्सपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे वाहनचालकांसह पादचारींना रस्त्यावरून चालणे कठीण होते. पोलीस, प्रशासन व सामान्य नागरिकांनी या समस्येपुढे गुडघे टेकले आहे. समस्या अधिकच जटील होत असल्याचे लक्षात घेऊन ‘लोकमत’ने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अभियान सुरू केले आहे.
यामागील मुख्य उद्देश हा क्रिकेट सामन्याच्या दिवशी होणाऱ्या ट्रॅफिक जाम समस्येचे समाधान शोधणे आहे. यातून क्रिकेटप्रेमींना क्रिकेट सामन्यांचा अधिक चांगला आनंद घेता येईल; शिवाय वाहतूक समस्येचा सामना करावा लागणार नाही. तसेच सामान्य नागरिकांसाठी येथील क्रिकेट सामन्यांचे आयोजन डोकेदुखी ठरणार नाही. या अभियानाचा एक भाग म्हणून ‘लोकमत भवन’मध्ये एका चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यात खासदार कृपाल तुमाने, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता जीवन निकोसे, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुधीर (बंडू) राऊत व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपमहाप्रबंधक (टेक्निकल) एन.एल. यवतकर यांनी भाग घेतला होता. जामठा स्टेडियमवरील क्रिकेट सामन्याच्या दिवशी वाहतुकीची कोंडी होण्यामागे व्यवस्थेतील नियोजनाचा अभाव, एक मोठे कारण असल्याचा सूरचर्चेतून पुढे आला. व्हीसीएने याकडे कधीच गांंभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळेच वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
क्रिकेट सामन्याच्या दिवशी अनेकदा संपूर्ण शहरातील वाहतूक ठप्प झाल्यासारखे चित्र तयार होते. वर्धा मार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे स्टेडियममधील पार्किंगपासून मुख्य रस्त्यावर येण्यासाठीच तासन्तास लागतात. यामुळे क्रिकेट सामना पाहण्यासाठी जाणे लोकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. क्रिकेट सामना संपल्यानंतर लोकांना या ट्राफिक जामचा अधिकच सामना करावा लागतो. टीम इंडिया मॅच जिंकली, तरी त्याचा संपूर्ण उत्साह ट्राफिकमधून बाहेर पडण्यातच थंड होतो. आणि टीम इंडिया हारली, तर त्याचा राग दुसऱ्या वाहनांवर काढल्या जातो. या वाहतूक समस्येचा खरा त्रास हा क्रिकेटप्रेमींपेक्षा या मार्गावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. क्रिकेट सामना सुरू होण्याच्या तीन तासांपूर्वीच वर्धा रोडवर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. याकडे प्रशासनाचे अनेकदा लक्ष वेधण्यात आले. परंतु अजूनपर्यंत समस्येचे समाधान झाले नाही. पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. यामुळे व्हीसीएचे पदाधिकारी ही समस्या गांभीर्याने घेतील, अशी अपेक्षा केली जात आहे. जाणकारांच्या मते, व्हीसीएने केवळ क्रिकेट सामन्यांच्या आयोजनापर्यंतच स्वत:ला मर्यादित करू नये. वाहतूक समस्याबाबत व्हीसीएने गंभीर झाले पाहिजे. ही समस्या त्यांनी तयार केली आहे, हे व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या समस्येच्या समाधानासाठीसुद्धा त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. यातूनच ट्रॉफिक जामच्या समस्येतून लोकांची सुटका होऊ शकते, अन्यथा समस्या दिवसेंदिवस अधिक जटील होत जाईल. (प्रतिनिधी)
व्हीसीए खासगी संस्था
चर्चेत सर्वांनी व्हीसीए एक खासगी संस्था असल्याचा सूर व्यक्त केला. शिवाय व्हीसीएला क्रिकेट सामन्यांच्या आयोजनातून उत्पन्न मिळत असून, त्यामुळे पैशाची व्हीसीएकडे काहीही टंचाई नसल्याचे बोलण्यात आले. मात्र असे असताना व्हीसीए या समस्येकडे गंभीरतेने लक्ष देत नाही. जेव्हा की या समस्येचे समाधान शोधणे त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. यासाठी व्हीसीएच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून जमीन घेऊन त्यावर एक स्वतंत्र रोड तयार करावा. यामुळे स्टेडियमकडे जाणाऱ्यांना ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही, शिवाय यातून वाहतुकीचीसुद्धा समस्या सुटेल.