मिहानच्या पुनर्वसनात भेदभाव
By Admin | Updated: February 1, 2015 00:57 IST2015-02-01T00:57:48+5:302015-02-01T00:57:48+5:30
पुनर्वसनात शासन आणि एमएडीसीने भेदभाव केल्याचा आरोप करीत सुधारित पुनर्वसनाच्या मागणीसाठी मौजा शिवणगावच्या विक्तुबाबानगर येथील प्रकल्पग्रस्त रविवार,

मिहानच्या पुनर्वसनात भेदभाव
विक्तुबाबानगर येथील प्रकल्पग्रस्तांचा आरोप : आज रामगिरीवर मोर्चा
नागपूर : पुनर्वसनात शासन आणि एमएडीसीने भेदभाव केल्याचा आरोप करीत सुधारित पुनर्वसनाच्या मागणीसाठी मौजा शिवणगावच्या विक्तुबाबानगर येथील प्रकल्पग्रस्त रविवार, १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेणार आहे.
मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समिती (संस्था) विक्तुबाबानगरचे सचिव नटराज पिल्ले यांनी सांगितले की, पुनर्वसनात शिवणगावातील रहिवासी आणि गावाबाहेरील रहिवाशांना शासनाने वेगवेगळा न्याय दिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी पदारूढ होण्यापूर्वी शिवणगावच्या गावठाणबाहेरील दोन वस्त्यांचे पुनर्वसन करताना चिचभुवन येथे प्रकल्पग्रस्ताला ३५० चौरस फूटाचा प्लॉट व अन्य फायदे मिळणार होते. मुख्यमंत्री पदारूढ होताच शिवणगावातील आंदोलनाच्या नेत्यांनी विक्तुबाबानगरातील लोकांना अंधारात ठेवून २४१ घरांच्या एका वस्तीला गावठाणची वाढ आबादी म्हणून गावठाणमध्ये आणले आणि १५०० चौ.फूटाचे प्लॉट, जागेची किंमत, इमल्याची रक्कम आणि एकाला नोकरी असे पॅकेज करवून आणले. विक्तुबाबानगरची २३३ घरांची अर्थात १५०० लोकसंख्या असलेली वस्ती ५० वर्ष जुनी आहे. येथील येथील रहिवासी २५ वर्षांपासून मनपाचा कर भरतात. पण शासनाने ही वस्ती झुडपी जंगलात असल्याचे दाखवून वेगळा न्याय दिला. अधिकारी रहिवाशांना त्रास देत असल्याच आरोप करीत पिल्ले यांनी २४१ घरांच्या वस्तीला मिळालेला न्याय आम्हालाही मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे लोकमतशी बोलताना केली.
सदोष सर्वेसाठी शासनाचे पुनर्वसन अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप पिल्ले यांनी केला.
एकाच न्यायाने पुनर्वसन करा
वीज बील महावितरण घेते. पण शासनाच्या कागदोपत्री मात्र ही वस्ती झुडपी जंगलात आहे. त्यामुळे १५०० चौ.फूटाचे प्लॉट आणि अन्य फायदे या वस्तीला देता येणार नाही, अशी माहिती पुनर्वसन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याने आमच्या वस्तीला योग्य न्याय मिळाला नाही, असा आरोप येथील रहिवासी हरीभाऊ काळे, सुरेश शंभरकर आणि अनेक महिलांनी लोकमतशी बोलताना केला. साखळी उपोषणात दिलीप सातपुते, मनोज टेकाडे, अंकुश ठाकरे, अनिल पाचोळे, रिताताई लांजेवार, पार्वताबाई झोडे, उज्ज्वला गुळघाणे, साधना चौधरी, कमला जयस्वाल, मुक्ताबाई कडवे, शांताबाई सातपुते आदींसह अन्यचा सहभाग आहे.
‘तुम्ही तुमचे पाहा’
समितीेचे अध्यक्ष संजय बोडे यांनी सांगितले की, शिवणगावासीयांच्या आंदोलनात विक्तुबाबानगर येथील संपूर्ण रहिवाशांनी साथ दिली. विविध मागण्यांसाठी येथील महिलांनी केशवपन केले, शिवाय पाण्याच्या टाकीवर चढून युवकांनी शासनाचे लक्ष वेधले होते. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला विक्तुबाबानगर येथील रहिवाशांमुळेच योग्य व सुधारित पॅकेज मिळाले. पॅकेज मिळताच आम्हाला वाऱ्यावर सोडून दिले. ‘तुम्ही तुमचे पाहा’ असे आंदोलनकर्त्या नेत्याचे शब्द आहेत. आता आमचे आंदोलन स्वतंत्र आहे. लढा आरपारचा आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण आहे. ६० वर्षीय पंचफुला मेश्राम या महिलेची तब्येत गंभीर आहे. २९ जानेवारीला तिला मेडिकलमध्ये भरती केले होते. यापूर्वी १२ डिसेंबर २०१४ रोजी विधानसभेवर मोर्चा नेला होता. मु्ख्यमंत्र्यांनी प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते.