व्यापाऱ्यांमध्ये असंतोष
By Admin | Updated: January 9, 2015 00:49 IST2015-01-09T00:49:45+5:302015-01-09T00:49:45+5:30
नायलॉन मांजाबाबत काही वर्षांपासून वाद सुरू आहे. संक्रांत आली की नायलॉन मांजावर बंदी घातली जाते. नायलॉन मांजा घातक आहे बाब मान्य आहे. परंतु त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत.

व्यापाऱ्यांमध्ये असंतोष
वाद नायलॉन मांजाच्या बंदीचा : प्रशासन आतापर्यंत झोपले होते का ?
नागपूर : नायलॉन मांजाबाबत काही वर्षांपासून वाद सुरू आहे. संक्रांत आली की नायलॉन मांजावर बंदी घातली जाते. नायलॉन मांजा घातक आहे बाब मान्य आहे. परंतु त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. त्याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता आम्ही मांजा विक्रेत्यांनी ८ डिसेंबर रोजी पोलीस विभाग व मनपा आयुक्तांना एक निवेदन सादर केले होते. त्यात आम्ही स्पष्टपणे विचारणा केली होती की, नायलॉन मांजावर बंदी घालण्याबाबत प्रशासनाचा काही विचार आहे का?, बंदी घालायचीच असेल तर आताच सांगण्यात यावे, असेही सुचविण्यात आले होते. परंतु तेव्हा प्रशासनाकडून काहीही कळविण्यात आले नाही. तसेच यासंबंधात आम्ही यापूर्वी न्यायालयात सुद्धा गेलो आहोत. न्यायालयाने सुद्धा आमच्या बाजूने निकाल दिला होता. आता मकरसंक्रांतीचा सण जवळ आला आहे. व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा माल घेऊन ठेवला आहे. त्याचे काय करायचे. बंदी घालायचीच होती तर अगोदरच घालायला हवी होती. ही बंदी केवळ व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणारे असून अन्यायकारक आहे. इतकेच नव्हे तर न्यायालयाचा अवमान करणारी सुद्धा आहे, असे मत नायलॉन मांजाचे ठोक विक्रेते राकेश शाहू यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
उत्पादनावरच बंदी का नाही
नायलॉन मांजा हा घातक आहे, ही बाब मान्य आहे. परंतु केवळ विक्री आणि उडवण्यावर बंदी घालून ठोस काहीही साध्य होणार नाही. बंदी घालायचीच होती तर अगोदर घालायला हवी होती. आम्ही तो माल खरेदी करूनच ठेवला नसता. लाखो रुपयांचा माल सध्या पडून आहे. त्यामुळे आमचे नुकसान झालेच आहे. दरवर्षी केवळ सणाच्या दिवशी बंदी घालून काहीही होणार नाही. बंदी घालायचीच असेल तर नायलॉन मांजाच्या उत्पादनावरच बंदी घालण्यात यावी.
- सुनील शाहू , नायलॉन मांजा विक्रेता
आमची काय चूक
आम्ही विक्रेते आहोत. नायलॉन मांजाला चायनीज मांजा सुद्धा म्हटले जाते. परंतु आम्ही हा माल काही चायनामधून आणत नाही. आपल्याच देशात हा मांजा तयार होतो. बंगळुरु येथून आम्ही तो आणतो. लोकांना स्वस्त पडतो म्हणून त्याची मागणी आहे. आम्ही व्यवसाय करणारे आहोत. ज्याची मागणी असेल तो माल आम्ही विकणार यात आमची काय चूक आहे. नायलॉनसोबतच पारंपरिक मांजाही आम्ही ठेवतो, लोक जे मागतील ते आम्ही विकू.
-विक्रांत शाहू, मांजा विक्रेता