मुलगी जन्मल्यामुळे निराश पती घटस्फोट मिळविण्यात अपयशी
By Admin | Updated: July 29, 2015 03:09 IST2015-07-29T03:09:17+5:302015-07-29T03:09:17+5:30
मुलगी जन्माला आल्यामुळे निराश झालेल्या पतीला घटस्फोट मिळविण्यात अपयश आले आहे.

मुलगी जन्मल्यामुळे निराश पती घटस्फोट मिळविण्यात अपयशी
हायकोर्टाची चपराक : पत्नीच्या वागणुकीतील क्रूरता सिद्ध झाली नाही
नागपूर : मुलगी जन्माला आल्यामुळे निराश झालेल्या पतीला घटस्फोट मिळविण्यात अपयश आले आहे. सुरुवातीला कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका फेटाळली होती. या निर्णयाविरुद्ध पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले होते. उच्च न्यायालयानेही दिलासा नाकारला. यामुळे पतीला जोरदार चपराक बसली आहे.
पतीने पत्नीची क्रूरता व विभक्ततेच्या आधारावर घटस्फोट मिळविण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचवेळी पत्नीनेही वैवाहिक अधिकार जपण्यासाठी व पोटगी मंजूर करण्यासाठी दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. १० आॅगस्ट २०११ रोजी कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका खारीज तर, पत्नीची वैवाहिक अधिकार जपण्याची याचिका मंजूर केली. तसेच, पत्नी व तिच्या मुलीला १० हजार रुपये महिना पोटगी मंजूर केली. या निर्णयाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अपील केले होते तर, पत्नीने पोटगी वाढवून देण्यासाठी प्रथम अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व प्रसन्न वराळे यांनी दोघांचेही अपील फेटाळून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
राजेश व राजश्री (काल्पनिक नावे) यांचे १९ मे २००१ रोजी लग्न झाले होते. राजेश पुणेत नोकरी करतो. राजश्रीचे माहेर नागपूरचे आहे. राजश्रीला मुलगी झाल्यामुळे राजेश व त्याचे आई-वडील नाराज झाले होते. यामुळे राजेशने घटस्फोट मिळविण्यासाठी राजश्रीविरुद्ध काल्पनिक कथा रचली होती. राजश्रीने लग्नाच्या वेळी तिच्या हातावर पांढरे डाग असल्याचे लपवून ठेवले. लग्नानंतर चार वर्षांनी तिच्या हातावरील पांढरे डाग दिसून आले. राजश्रीची वागणूक क्रूरतापूर्ण असून ती सतत भांडण करते. कधी-कधी हिंसक होते. ती शयनकक्षाला आतून कुलुप लावून झोपत होती. शरीरसंबंध टाळत होती असे राजेशचे म्हणणे होते. परंतु, राजेशला त्याचे म्हणणे सिद्ध करण्यात अपयश आले. कौटुंबिक न्यायालयासह उच्च न्यायालयानेही त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही.
राजेश व राजश्रीचे एका बँकेत जाईन्ट अकाऊंट होते. राजेशने १४ मार्च २००५ रोजी त्यातील सर्व रक्कम काढून घेतली.
राजश्रीसोबत रहायचे असते तर त्याने असे केले नसते. त्याने राजश्रीला घरी आणण्यासाठी प्रयत्न केल्याचाही काहीच पुरावा नाही. बाळंतपणापूर्वी दोघांचे सबंध चांगले होते. मुलगी झाल्यानंतर परिस्थिती बदलली असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. (प्रतिनिधी)