जीवनदायीच्या प्रवास भत्त्यांपासून रुग्ण वंचित
By Admin | Updated: June 2, 2017 02:33 IST2017-06-02T02:33:51+5:302017-06-02T02:33:51+5:30
गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभार्थी रुग्णांना मोफत

जीवनदायीच्या प्रवास भत्त्यांपासून रुग्ण वंचित
रक्कम दिल्याचे छायाचित्र काढून घेताच परत घेतात रक्कम : रुग्णाच्या नातेवाईकाची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभार्थी रुग्णांना मोफत उपचारासोबतच प्रवास भत्ताही दिला जातो, मात्र मेडिकलमध्ये रुग्णांच्या हातात ही रक्कम देऊन छायाचित्र काढून घेतल्यानंतर, ती रक्कम परत घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाने समोर येऊन ही तक्रार केली. विशेष म्हणजे, तक्रारकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांपासून ते अधिष्ठात्यापर्यंत सर्वांकडे दाद मागितली, मात्र अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही.
गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हिताची ठरत आहे. मात्र काही कर्मचारी पैशाच्या हव्यासापोटी या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्यापर्यंत त्यांचा लाभ पोहचू देत नसल्याचे चित्र आहे. या योजनेंतर्गत संबंधित रुग्णाला उपचारानंतर रुग्णालयातून सुटी झाल्यावर घरी परत जाण्याकरिता तो राहत असलेल्या गाव किंवा शहरातील अंतरानुसार विशिष्ट रक्कम प्रवास भत्त्याच्या स्वरूपात रोख दिली जाते. याचा पुरावा म्हणून योजनेच्या कर्मचाऱ्याला रुग्णाला रक्कम दिल्याचे छायाचित्र काढावे लागते. योजनेच्या सिस्टिममध्ये हे छायाचित्र अपलोड करावे लागते. मात्र, कर्मचारी रुग्णांना पैसे देतात, पण छायाचित्र काढल्यानंतर ही रक्कम रुग्णाकडून परत घेतात. कुणी आक्षेप घेतल्यास आमच्याकडे छायाचित्र पुरावा असून तुम्ही रक्कम मिळाली नाही, असे स्पष्ट करू शकत नसल्याचे सांगत नातेवाईकांना हुसकावून लावतात. मेडिकलमध्ये हा प्रकार अनेक रुग्णांसोबत झाल्याचे सामोर आले आहे.
औषधांचे बिलही
मिळत नाही
या योजनेंतर्गत रुग्णाने औषध बाहेरून आणल्यास त्यांना ही बिले कालांतराने मेडिकल प्रशासनाकडून अदा केली जातात, परंतु मेडिकलमध्ये ही रक्कम देण्याकरिता लिपिक व डॉक्टर टाळाटाळ करतात. एका कर्करुग्णासोबत हा प्रसंग घडला आहे. त्यातच या रुग्णांना प्रवास भत्त्याची रक्कम दिल्याचे छायाचित्र काढताच हे कर्मचारी रक्कम परत घेतात. ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांसह अनेकांना केली आहे. परंतु अद्यापही कारवाई झालेली नाही.
-अविनाश गडेकर, तक्रारकर्ता