त्रिभुवनदास भीमजी झवेरीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:08 PM2018-01-13T22:08:08+5:302018-01-13T22:10:59+5:30

सोने जमा केल्यास वर्षाला १८ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी त्रिभुवनदास भीमजी झवेरी या प्रसिद्ध सराफा पेढीचे मालक हेमंत ब्रिजलाल झवेरी (रा. मुंबई) विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या घडामोडीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Director of Tribhuvanadas Bhimji Zaveri booked for cheating | त्रिभुवनदास भीमजी झवेरीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

त्रिभुवनदास भीमजी झवेरीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देफसवणुकीची तक्रार : लाखो रुपये थकविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोने जमा केल्यास वर्षाला १८ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी त्रिभुवनदास भीमजी झवेरी या प्रसिद्ध सराफा पेढीचे मालक हेमंत ब्रिजलाल झवेरी (रा. मुंबई) विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या घडामोडीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
सदरमधील बैरामजी टाऊन, पूनम चेंबरमध्ये त्रिभुवनदास भीमजी झवरी (टीबीझेड) नावाचे मोठे ज्वेलर्स आहे. येथे आपण सोने जमा ठेवल्यास महिन्याला दीड टक्का (वर्षाला १८ टक्के) व्याज देण्याची योजना चार वर्षांपूर्वी टीबीझेडने जाहीर केली होती. ज्वेलर्समध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला माहिती देऊन या योजनेत सहभागी होण्याचा आग्रह येथील कर्मचारी करीत होते. नेल्सन चौकात राहणारे अब्दुल कलाम आझाद अब्दुल मजिद (वय ६०) यांनी १ जानेवारी २०१४ ला या योजनेत सहभागी होऊन लाखोंचे सोने टीबीझेडकडे जमा केले. २० मार्च २०१७ ला त्यांनी आपली जमा झालेली ५० लाख रुपयांची रोकड परत मागितली. कलाम यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, टीबीझेडचे संचालक हेमंत झवेरी यांनी रक्कम परत देण्यास नकार दिला. बराच वाद झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्याचा कलाम यांनी पवित्रा घेतला. त्यामुळे त्यांना झवेरी यांनी रक्कम परत देण्याचे आश्वासन देऊन शांत केले. त्यानंतर त्यांना ५० पैकी ४६ लाख रुपये परत केले. उर्वरित ४ लाख रुपये देण्यास नकार दिल्यामुळे कलाम यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. राज्यातील सराफा पेढ्यांमध्ये मोठे नाव असलेल्या ज्वेलर्सच्या संचालकाविरुद्धची तक्रार असल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर शुक्रवारी रात्री सदरचे पोलीस उपनिरीक्षक एम. बी. चौरसिया यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आज दुपारी या घडामोडीची जोरदार चर्चा सराफा बाजारात पसरली. त्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले.
आणखी दोघांच्या तक्रारी
झवेरी यांनी लाखो रुपयांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आणखी दोघांनी सदर पोलीस ठाण्यात केल्या. त्याचाही वेगळा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या दोन तक्रारकर्त्यांची नावे उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, अन्य दोघांच्या अशाच तक्रारी आमच्याकडे आल्याचे सदर पोलिसांनी लोकमतशी बोलताना मान्य केले.

Web Title: Director of Tribhuvanadas Bhimji Zaveri booked for cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.