Directions to Center on corona from Sarsanghchalak | सरसंघचालकांकडून केंद्राला कोरोनावर बौद्धिक

सरसंघचालकांकडून केंद्राला कोरोनावर बौद्धिक

ठळक मुद्देशिक्षकांना वेतन, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावेरोजगारनिर्मितीवर भर द्यावा द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवादरम्यान सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या भाषणाचा भर कोरोना व त्यामुळे उत्पन्न झालेल्या अडचणींवर होता. कोरोना कधी संपेल हे सांगता येत नाही व त्यासोबत जगणे शिकावे लागणार आहे. स्थलांतरामुळे अनेकांचा रोजगार गेला. अनेकांना नवीन रोजगार मिळवायचा आहे, मात्र त्यांना प्रशिक्षण नाही. त्यामुळे रोजगारांचे निर्माण व प्रशिक्षण यावर विशेष भर द्यावा लागेल, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

कोरोना काळात अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: शैक्षणिक संस्था परत सुरू करणे, शिक्षकांचे वेतन देणे, मुलांच्या शाळा-महाविद्यालयांचे शुल्क देत त्यांना परत अभ्यासासाठी पाठविणे या गोष्टी सद्यस्थितीत मोठ्या समस्येचे रुप घेऊ शकतात. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांची सुरुवात, शिक्षकांचे वेतन तसेच मुलांच्या शिक्षणासाठी काही सेवा सहकार्य करावे लागेल. सर्व परिस्थितीमुळे कुटुंबांमध्ये व समाजात तणाव वाढण्याची स्थिती उत्पन्न होऊ शकते. अशा स्थितीत अपराध, औदासिन्य, आत्महत्या इत्यादी वाईट प्रवृत्ती वाढू नयेत यासाठी समुपदेशनाची व्यापक आवश्यकता आहे, असे प्रतिपादन डॉ.मोहन भागवत यांनी केले.

सफाई कर्मचारी, आरोग्य यंत्रणेची प्रशंसा
जगातील इतर देशांच्या तुलनेत आपला भारत संकटाच्या या परिस्थितीत जास्त चांगल्या पद्धतीने उभा राहिलेला दिसून येत आहे. याचे श्रेय शासनाप्रमाणेच प्रत्यक्ष राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाते. प्रशासनाचे कर्मचारी, विविध उपचारपद्धतींचे वैद्यकीय तज्ज्ञ तसेच सुरक्षा व स्वच्छतेसह सर्व कामांत सहभागी होणारे कर्मचारी यांनी धोका पत्करत युद्धपातळीवर सेवेचे कार्य केले, या शब्दांत सरसंघचालकांनी प्रशंसा केली.

कोरोनामुळे वाढले स्वदेशीचे महत्त्व
कोरोनामुळे काही सकारात्मक बाबीदेखील समोर आल्या. या काळात स्वदेशीचे महत्त्व वाढले. शिवाय लोकांना कौटुंबिक व्यवस्थेचे महत्त्व पटले व पर्यावरण संवर्धनाकडेदेखील नागरिकांचा ओढा वाढला, असेदेखील सरसंघचालक म्हणाले.

कृषी स्वावलंबन कधी होणार
यावेळी सरसंघचालकांनी कृषी धोरणांवरदेखील भाष्य केले. कृषी धोरणामुळे शेतकरी स्वत:चे बियाणे स्वतच बनविण्यासाठी स्वतंत्र झाला पाहिजे. शेतकऱ्यांना सहजपणे आधुनिक ज्ञानदेखील मिळाले पाहिजे. कॉपोर्रेट जगत व दलालांच्या जाळ्यातून त्याची सुटका झाली पाहिजे. कृषी व्यवस्था स्वावलंबनात भर दिला तरच स्वदेशी धोरण शक्य होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Directions to Center on corona from Sarsanghchalak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.