नागपुरात ‘रोबोटिक्स’ पदविका अभ्यासक्रम
By Admin | Updated: May 21, 2015 02:35 IST2015-05-21T02:35:38+5:302015-05-21T02:35:38+5:30
उपराजधानीतील विद्यार्थ्यांना लवकरच ‘रोबोटिक्स’ विषयात शिक्षणाचे दरवाजे उघडणार आहेत.

नागपुरात ‘रोबोटिक्स’ पदविका अभ्यासक्रम
नागपूर : उपराजधानीतील विद्यार्थ्यांना लवकरच ‘रोबोटिक्स’ विषयात शिक्षणाचे दरवाजे उघडणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ किंवा ‘व्हीएनआयटी’ येथे लवकरच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधात मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नागपूर विद्यापीठातील शिक्षणतज्ज्ञ व बंगळुरू येथील ‘एबीबी’ कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे.
जगभरात ‘रोबोटिक्स’चे वाढते महत्त्व लक्षात घेऊन नागपुरातदेखील ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाचे संशोधन केंद्र व त्यावर आधारित शैक्षणिक अभ्यासक्रम उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व ‘व्हीएनआयटी’च्या अधिकाऱ्यांशी मंगळवारी नागपुरात चर्चा केली होती. बंगळुरु येथील ‘एबीबी’ (एशिया ब्राऊन बोवरी) या कंपनीकडून शहरात ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाचे संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या अभ्यासक्रमाबाबत सादरीकरण केले. यावेळी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, ‘व्हीएनआयटी’च्या संचालकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.डी.के.अग्रवाल हेदेखील उपस्थित होते.
संबंधित अभ्यासक्रम ‘व्हीएनआयटी’ व नागपूर विद्यापीठात राबविण्यात येऊ शकतात काय याची चाचपणी यावेळी करण्यात आली. सोबतच या बैठकीत विविध मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर तो नेमका कुठे राबवावा याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)