नागपूर : आजची तरुण पिढी सण-उत्सवांशी जोडलेली आहे, मात्र तिला भक्तीचे सादरीकरण सोयीस्कर माध्यमांतून करण्याची गोडी लागली आहे. देवळात जाऊन भजन कीर्तन ऐकण्यापेक्षा मोबाईलवरील प्ले लिस्टमधून ते ऐकणे, श्रावण लूक'मध्ये इन्स्टाग्रामवर नाचत 'हर हर शंभो'वर रील्स बनवणे, उपवास करण्यापेक्षा उपवासाच्या जिन्नसाचस फोटो सोशल मीडियावर शेअर करणे या पिढीला अधिक भावते.
एकीकडे हरिपाठ करणारी वयोवृद्ध मंडळी, तर दुसरीकडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर 'श्रावण चॅलेंज' घेणारे तरुण, दोघंही श्रद्धेचेच पदर; पण मोबाइलवर आरती ऐकणे ही खरी भक्ती की फक्त सुविधा? व्रत पाळणे ही आध्यात्मिक साधना की सोशल मीडिया ट्रेंड? हा प्रश्न विचारायला हवा. वडीलधारी पिढी याला दिखावा मानते, तर तरुणाई म्हणते, "आम्ही परंपरा विसरलेलो नाही, फक्त आमच्या भाषेत जगतोय."
काही कीर्तनकार डिजिटल माध्यमांचा वापर करून कीर्तनाचे छोटे रील्स बनवतात; हजारोंनी शेअर्स होतात. व्हर्चुअल कीर्तन, झूम हरिपाठ, AI-जनरेटेड अध्यात्म - ही नवी वाट आहे. यातून परंपरा मोडत नाहीत; पण त्या अधिक वरवरच्या होण्याचा धोका वाढतो.
श्रद्धेच्या नावाखाली तयार होणारे अनेक रील्स मंदिराचे किंवा दैवताचे पावित्र्य हरवून टाकतात, काही ठिकाणी दिखाव्याचे प्रमाण भक्तीपेक्षा जास्त जाणवते. पूजा सुरू असतानाच रील्ससाठी कॅमेऱ्याकडे लक्ष देणे, ही खरी भक्ती की फक्त फॉलोअर्सची हाव? याकडे दुर्लक्ष होऊ नये. नक्कीच, सर्वच तरुण डिजिटल भक्तीकडे वळलेले नाहीत.
परिक्रमा, सप्तसृषींची यात्रा, त्र्यंबकेश्वराची प्रदक्षिणा, कावड यात्रा - यातही युवकांचा पुढाकार तितकाच दिसतो; पण 'सेल्फी विथ श्रद्धा' ही जर भक्तीची ओळख बनली, तर मूळ भावनेची पोकळी वाढेल. तंत्रज्ञानाचा वापर करताना भक्तीची खरी भावना, पवित्रता आणि अंतर्मुख आस्था जपणे हाच खरा गाभा आहे. डिजिटल भक्ती ही श्रद्धा आणि प्रदर्शन यांच्यामध्ये एक नाजूक समतोल ठेवणारी नवी वाट आहे.
श्रद्धा की ट्रेंड हा संघर्ष नसून संवादाची संधी आहे. परंपरेच्या मुळांना टेक्नॉलॉजीचा आधार मिळणे चांगले; पण तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली श्रद्धा ही श्रद्धेची जर सावलीसारखी उरली, तर ही डिजिटल भक्ती पुढे केवळ प्रदर्शनातच परिवर्तित होईल. नव्या पिढीने परंपरा झुगारली नाही; पण तिचं स्वरूप 'लाइक्स' आणि 'फॉलोअर्स'च्या भाषेत अडकू नयेच; परंपरेची पवित्रता टिकवण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज नक्की आहे, एवढीच अपेक्षा.
श्रावण महिना आला की, महाराष्ट्राच्या धार्मिक भावविश्वात एक नवा रंग भरतो. मंदिरांचे कळस भारलेले असतात. गावोगावी हरिभक्तांची ओजस्वी वाणी वातावरणात अध्यात्माची हवा निर्माण करते. ओव्या, हरिपाठ, व्रतवैकल्य... या साऱ्यांनी श्रावण महिना चिंब भिजतो. श्रद्धा आणि भक्ती ही मानवी मनाची दोन गहिरी स्पंदनं; परंपरेने ती विविध रूपांत उमलत आली आहे; पण आजच्या काळात, विशेषतः नव्या पिढीत ही भक्ती मोबाइलच्या स्क्रीनवरून, डिजिटल माध्यमांतून आणि सोशल नेटवर्कवरून व्यक्त होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. पारंपरिक भक्तीच्या प्रवाहात आलेले हे वळण म्हणजे डिजिटल भक्तीचा ट्रेंड.