‘पीएचडी’ करणे होणार कठीण

By Admin | Updated: November 13, 2015 02:38 IST2015-11-13T02:38:54+5:302015-11-13T02:38:54+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’संदर्भातील नियम आणखी कडक करण्याचे ठरविले आहे.

Difficult to be a 'PhD' | ‘पीएचडी’ करणे होणार कठीण

‘पीएचडी’ करणे होणार कठीण

नागपूर विद्यापीठ : नोंदणीसाठी ‘पेट’ अनिवार्य, प्रक्रिया ‘आॅनलाईन’
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’संदर्भातील नियम आणखी कडक करण्याचे ठरविले आहे. ‘पीएचडी’ करताना ‘युजीसी’च्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक ठरणारच आहे. शिवाय ‘पीएचडी’ची पूर्ण प्रक्रिया ‘आॅनलाईन’ करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. याशिवाय नोंदणीसाठी सर्वाना ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) अनिवार्य करण्यात येणार आहे. या सुधारणांसाठी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने मसुदा तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ करणे फार सोपे असल्याचा अनेकांमध्ये समज आहे. ‘युजीसी’च्या पूर्ण नियमावलीचे पालन येथे करण्यात येत नसल्याची ओरड होत होती. शिवाय विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाल्यामुळे ‘पीएचडी’च्या स्तरातदेखील वाढ करण्याची प्रशासनाला आवश्यकता वाटत होती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन विद्यापीठाने ८ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. यात प्र-कुलगुरूंसमवेत डॉ.अरविंद चौधरी, डॉ. विनायक देशपांडे, डॉ.राजू मानकर यांच्यासारख्या तज्ज्ञांचा समावेश आहे.
‘आयटी रिफॉर्म्स’चा अवलंब करत असताना ‘पीएचडी’ प्रक्रियादेखील ‘आॅनलाईन’ करण्यात येणार आहे. यात अर्ज सादर करण्यापासून ते अगदी ‘सिनॉप्सिस’चे सादरीकरणदेखील ‘आॅनलाईन’ पद्धतीनेच व्हावे याकरिता प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे अनेक गैरप्रकारदेखील नियंत्रणात येतील. या समितीने या सर्व मुद्यांवर सखोल अभ्यास करुन मसुदा अहवाल तयार केला आहे.
आजच्या तारखेत ‘नेट’ किंवा ‘सेट’ उत्तीर्ण असलेले किंवा संशोधन तसेच ठराविक वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेल्यांना ‘पेट’पासून सूट देण्यात येते. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांत असे काहीही नाही. त्यामुळे ही सूट विद्यापीठातूनदेखील काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)

‘जर्नल’चीदेखील मिळणार यादी
‘पीएचडी’दरम्यान ‘कोर्सवर्क’ करणे विद्यार्थ्यांना अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु या ‘कोर्सवर्क’चे कुठेही मूल्यांकन होत नाही. याच्या मूल्यांकनासंदर्भात या समितीकडून शिफारशी होण्याची शक्यता आहे. शिवाय शोधपत्रिकांचे प्रकाशन कोणत्या ‘जर्नल’मध्ये व्हावे याची यादीदेखील विद्यापीठाकडूनच देण्यात येईल. तसेच संशोधकाला प्रबंध सादर करण्यापूर्वी संबंधित अभ्यासकेंद्रात त्याचे सादरीकरण देणे अनिवार्य राहणार आहे. ६ जुलै रोजी ‘युजीसी’ने ‘पीएचडी’संदर्भात जी नियमावली जारी केली तिचे तंतोतंत पालन करण्यासंदर्भात ही समिती काम करेल, असे प्र-कुलगुरूंनी स्पष्ट केले.

Web Title: Difficult to be a 'PhD'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.