विदर्भावर यांची बोलती बंद का?
By Admin | Updated: August 29, 2016 02:39 IST2016-08-29T02:39:29+5:302016-08-29T02:39:29+5:30
विदर्भ खऱ्या अर्थाने खूप मोठा आहे. भारताचे हे हृदय आहे. ते मजबूत झाले पाहिजे. विदर्भाच्या प्रवक्त्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी आवाज बुलंद केला होता.

विदर्भावर यांची बोलती बंद का?
फडणवीस-गडकरींना वेद प्रताप वैदिक यांचा सवाल :
भंवर मे सियासत पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर : विदर्भ खऱ्या अर्थाने खूप मोठा आहे. भारताचे हे हृदय आहे. ते मजबूत झाले पाहिजे. विदर्भाच्या प्रवक्त्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी आवाज बुलंद केला होता. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बोलती बंद का आहे, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी येथे केला.
रविनगर चौकातील अग्रसेन भवन येथे रविवारी सायंकाळी बी.जे. अग्रवाल लिखित ‘भंवर मे सियासत’ या हिंदी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी समीक्षक म्हणून ते बोलत होते.
बबनराव ढाकणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा मुख्य अतिथी होते. माजी गृहमंत्री जयंत पाटील, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, डिस्ट्रीक्ट बार कौन्सिलचे अध्यक्ष सुदीप जयस्वाल, अग्रसेन मंडळच्या अध्यक्ष उर्मिला अग्रवाल, माजी महापौर किशोर डोरले व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे उपस्थित होते. जयंत पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. बी.जे. अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन संदीप अग्रवाल यांनी केले. विजय जैन यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
जनतेच्या कार्यासाठी समर्पित जीवन
मुख्य अतिथी म्हणून आपले विचार व्यक्त करतांना विजय दर्डा म्हणाले, अॅड. बी.जे. अग्रवाल यांनी आयुष्यभर इमानदारीने काम केले. माजी पंतप्रधान चंद्रशेखर व माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्यासोबत त्यांनी जनतेसाठी काम केले. वकील म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले. माझ्या वडिलांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. या पुस्तक प्रकाशनासाठी इतके लोक आलेत ते यथोचितच असल्याचेही ते म्हणाले.