नांद येथे डायरियाची लागण

By Admin | Updated: May 29, 2014 03:25 IST2014-05-29T03:25:48+5:302014-05-29T03:25:48+5:30

भिवापूर तालुक्यातील नांद येथे डायरियाची लागण झाली असून, १५ रुग्ण आढळून आले आहेत.

Diarrhea infection at nand | नांद येथे डायरियाची लागण

नांद येथे डायरियाची लागण

नांद : भिवापूर तालुक्यातील नांद येथे डायरियाची लागण झाली असून, १५ रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती नांद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. राजपूत यांनी सांगितले. हा सर्व प्रकार दूषित पाण्यामुळे घडला असून, याला डॉ. राजपूत यांनी दुजोरा दिला आहे.

नांद या गावाची लोकसंख्या १0 हजाराच्या आसपास आहे. या संपूर्ण गावाला नळ योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. यासाठी चार बोअरवेल्सचा वापर केला जातो. यातील दोन बोअरवेल्सला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मरवरून वीजपुरवठा केला जातो. सदर ट्रान्सफॉर्मर काही दिवसांपूर्वी जळाले. ते वेळीच बदलविण्यात न आल्याने यातील दोन बोअरवेल्सवरून गावाला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. कारण, या ट्रान्सफॉर्मरवरून या दोन्ही बोअरवेल्सला वीजपुरवठा केला जातो. बंद असलेल्या दोन्ही बोअरवेल्स या महादेवघाट व सकसार येथे आहेत. परिणामी, संपूर्ण गावाला उर्वरित दोन बोअरवेल्सवरून पाणीपुरवठा केला जातो.

सदर गाव नांद व धरमपेठ अशा दोन भागात विभागले आहे. या संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या दोन टाक्याही बांधण्यात आल्या आहेत. यातील पाच लाख लिटर क्षमतेच्या टाकीतून नांद व ५0 हजार लिटर क्षमतेच्या टाकीतून धरमपेठ या वस्तीला पाणीपुरवठा केला जातो. गावात एकूण आठ सार्वजनिक विहिरी असून, त्यातील पाण्याचा कधीच वापर केला जात नसल्याने या सर्व विहिरींमधील पाणी पिण्यास अयोग्य आहे.

गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या दोन बोअरवेल्सपैकी एका बोअरवेल्सचे पाणी पिवळसर आहे. शिवाय, आठवडाभरापासून पिण्याच्या पाण्यात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने ब्लिचिंग पावडरही टाकले नाही. ग्रामपंचायत कार्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली असता, कार्यालयात ब्लिचिंग पावडरचा साठा असल्याचे आढळून आले. या संदर्भात स्थानिक सरपंच कविता भैसारे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतमध्ये तीन चपराशी कार्यरत आहे. यातील मुख्य चपराशावर पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा चपराशी चार दिवसांपासून लग्नानिमित्त सुटीवर गेला आहे. उर्वरित दोन चपराशांनी हलगर्जीपणा केल्याने पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही, असेही कविता भैसारे यांनी सांगितले. मात्र, यात दोषी असणार्‍यांवर काय कारवाई केली जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

या दोन्ही बोअरवेल्समधून पुरेसे पाणी मिळत नसल्याने स्थानिक महिलांना गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या राजहंसबाबा मठातील विहिरीवरून रोज पाणी आणावे लागते. गावात बहुतांश नागरिकांकडे घरगुती नळ कनेक्शन असून, त्यांनी पाण्यासाठी खड्डे खोदले आहे. यातील काही खड्डे नालीलगत असून, त्यात पाणी साठून राहते. पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर याच खड्डय़ातील पाणी नळाच्या पाईपमध्ये शिरते. यात नालीतील सांडपाणीही मिसळलेले असते. (वार्ताहर)

Web Title: Diarrhea infection at nand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.