‘डायबेटिज’ शिकवितो अनुशासन
By Admin | Updated: August 18, 2014 00:37 IST2014-08-18T00:37:02+5:302014-08-18T00:37:02+5:30
चालणे, व्यायाम करणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. परंतु व्यक्तीला ते सांगितले तर ती कंटाळा करते. परंतु एखादा मधुमेही रुग्ण मात्र नियमितपणे व्यायाम करतो. किती खायचे,

‘डायबेटिज’ शिकवितो अनुशासन
हॅलो डायबेटिजला उत्स्फूर्त प्रतिसाद : मधुमेहतज्ज्ञ सुनील गुप्ता यांचे प्रतिपादन
नागपूर : चालणे, व्यायाम करणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. परंतु व्यक्तीला ते सांगितले तर ती कंटाळा करते. परंतु एखादा मधुमेही रुग्ण मात्र नियमितपणे व्यायाम करतो. किती खायचे, किती चालायचे, कोणता आहार घ्यायचा याबाबत तो जागरूक असतो. तेव्हा डायबेटीज रुग्णाला जीवनात अनुशासन शिकवित असतो, त्यामुळे हा आजार शाप नसून एक प्रकारे वरदानच आहे. रुग्णांनी सकारात्मक विचार करावा, असा मोलाचा सल्ला मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी दिला.
डायबेटिज केअर अॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी ‘हॅलो डायबेटिज’ हा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अविनाश पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, मनपा आयुक्त श्याम वर्धने, आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. मिलिंद नाईक, कुलगुरू डॉ. दिलीप गोडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी खा. अविनाश पांडे यांनी उपस्थित मधुमेही रुग्णांना जीवनात सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले. डॉ. सुनील गुप्ता यांनी व्याख्यानात डायबेटीज आजाराविषयी सखोल मार्गदर्शन केले. व्यायाम हा शरीरासाठी नेहमीच चांगला असतो परंतु जो व्यायाम व्यक्तीला आवडत असेल तोच केला पाहिजे. कुणाला डान्स करणे तर कुणाला पोहणे आवडत असेल तर तो सुद्धा व्यायामाचाच एक प्रकार आहे. आठवड्यात १५० मिनिटे चालणे हा सर्वोत्कृष्ट व्यायाम असल्याची पावतीसुद्धा त्यांनी यावेळी दिली. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात ‘मधुमेह आणि डोळे’ यावर डॉ. अजय अंबादे, ‘मधुमेह आणि तणाव’ यावर डॉ. सुधीर भावे, आहार यावर कविता गुप्ता, फूट केयर यावर विनिता मेहता यांनी मार्गदर्शन केले. छोट्या-छोट्या नाटकांद्वारे आणि पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे मधुमेहासंबंधातील समज गैरसमजासह सखोल माहिती सादर करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. मधुमेहाबाबत प्रश्न विचारणाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी आहार प्रदर्शन भरविण्यात आले होते. आर.जे. नितीन यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)