ओव्हरलोड वाहनांमुळे वाढले अपघात : बांधकामामुळे रस्ता अरुंद नागपूर : कोराडी रोड हा राष्ट्रीय महामार्ग आहे. सध्या या महामार्गाच्या चार पदरीचे काम सुरू आहे. यातच उड्डाणपुलाचेही काम जोरात सुरू असल्याने पागलखाना चौक ते कोराडी पॉवर प्लांटपर्यंंत दोन्ही मार्गावरील रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. असे असतानाही या रोडवरून ऑटो, जीप, ट्रॅक्स व इतर प्रवासी वाहने ‘ओव्हलोड’ प्रवाशांसह भरधाव वेगात सर्रास धावत आहेत. या प्रवासी वाहनांची हीच गती प्रवाशांसाठी मात्र जीवघेणी ठरत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे रविवारी कोराडी विद्युत विहार गेटसमोर घडलेला अपघात होय. भरधाव वेगाने येत असलेल्या जीप चालकांचे नियंत्रण वाहनावरून सुटल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी आहेत. कोरडी रोडच्या रस्त्याचे काम सध्या सुरू असल्याने दोन्ही बाजूने रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. अशा परिस्थितीतही वाहनांची गती मात्र कमी करायला कुणी तयार नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. परंतु या सर्व गोष्टींची जाणीव असूनही आरटीओ विभागातर्फे मात्र कुठलीही कारवाई का होत नाही, हा प्रश्नच आहे. कोराडी रोडवरून सदर, बर्डीमार्गे कोराडी व खापरखेड्यापर्यंंत सहा सीटर वाहने चालतात. सहा सीटर वाहने असूनही १२ ते १४ प्रवासी बसविले जातात. तसेच टेकडी रोड सीताबर्डी आणि एलआयसी चौकातील कस्तुरचंद पार्कजवळून सौंसर आणि छिंदवाड्यासाठी सवारी जीप चालते. या वाहनांमध्ये १५ ते १६ प्रवासी जनावरांप्रमाणे भरले जातात. तसेच जीप चालकाच्या सीटला लागून चार ते पाच प्रवासी आणखी बसवून भरधाव वेगाने ही वाहने चालविली जात आहेत. ही वाहने शहरातील मॉरिस कॉलेज टी पॉईंट, संविधान चौक, एलआयसी चौक, रेसिडेन्सी चौक सदर, अंजुमन कॉलेज चौक, छावणी आणि मानकापूर चौकातून जातात; तरीही या वाहनांवर वाहतुक पोलिसांकडून कुठलीही कारवाई का होत नाही, हा प्रश्नच आहे. (प्रतिनिधी) मानकापूर नेहमीच जाम कोराडी रोडवरील सर्वात व्यस्त असलेला मानकापूर चौक दुचाकी वाहनचालकांसाठी सर्वाधिक धोकायदाय झाला आहे. या चौकातून नारा रिंग रोड ते गोरेवाडा, वाडी नाकाकडे जाणार्या जड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. तर बर्डी, सदर आणि इतर मार्गाकडून कोराडी, खापरखेडा मार्गावरील वस्त्यांमध्ये राहणार्या नागरिकांची ये-जा मोठय़ा प्रमाणवर असते. चौकातच उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने येथील वाहतूक नियंत्रित ठेवणे अतिशय कठीण झाले आहे. अशा परिस्थितीतही येथे केवळ एक किंवा दोन वाहतूक पोलीसच कार्यरत असतात. त्यांची नजर चुकली की भरधाव वेगाने येणारे चालक नियमाची पायमल्ली करतात. या रोडवर सकाळी ९.३0 ते सायंकाळी ५.३0 नंतर वाहतुकीची परिस्थिती अतिशय बिकट असते. यानंतर तासन्तास जाम असतो. कोराडी नाक्यावर जड वाहनांची गर्दी कोराडी नाक्याजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रक, टिप्पर आणि जड वाहने पार्क केली जातात. रस्त्यावरून जाणार्या वाहनचालकांना दिवसा ही जड वाहने दिसतात. परंतु रात्रीच्या वेळी मात्र यापैकी बहुतांश वाहनांवर स्टिकर नसल्याने आणि पार्किंंग लाईट सुरू नसल्याने दिसत नाहीत. अशा स्थितीत भरधाव वेगाने येणारी वाहने उभ्या असलेल्या जड वाहनांवर धडकतात. रविवारीसुद्धा असेच घडले. भरधाव वेगाने येत असलेल्या जीपचालकाला विद्युत विहार समोर पंक्चर झालेला ट्रक दिसला नाही. त्यामुळे जीप ट्रकवर आदळली.
धोक्याचा कोराडी रोड
By admin | Updated: May 28, 2014 01:02 IST