धनगर समाजाची वेदना मांडणारे नाट्य रंगले
By Admin | Updated: July 17, 2014 01:07 IST2014-07-17T01:07:08+5:302014-07-17T01:07:08+5:30
भाग्यश्री क्रिएशन्स आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने हिंदी मोरभवन येथे रवी वाडकर लिखित आणि गिरीश पांडे दिग्दर्शित ‘मानसा परिस मेंढरं बरी’ या दीर्घांकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

धनगर समाजाची वेदना मांडणारे नाट्य रंगले
‘मानसा परिस मेंढरं बरी’चा नाट्यप्रयोग : स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे सादरीकरण
नागपूर : भाग्यश्री क्रिएशन्स आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने हिंदी मोरभवन येथे रवी वाडकर लिखित आणि गिरीश पांडे दिग्दर्शित ‘मानसा परिस मेंढरं बरी’ या दीर्घांकाचा प्रयोग सादर करण्यात आला. लोकनाट्याच्या स्वरूपात सादर करण्यात आलेल्या या नाट्यात धनगर जमातीचे दु:ख आणि वेदना प्रभावीपणे साकारण्यात आली. लोकनाट्याचा बाज असल्याने यात लोकसंगीत, लोकनृत्य, जुनी परंपरा, संस्कृती यांचा अभ्यासपूर्ण समावेश असल्याने नाटकाद्वारे एक संदेश रसिकांपर्यंत पोहोचविण्यात हा प्रयोग यशस्वी ठरला.
धनगर जमातीला आजही राजाश्रय आणि लोकाश्रय नाही. त्यांचे आयुष्य माळरानावरच जाते. काही प्रमाणात शिक्षणाचा प्रसार झाला आणि समाजातील मुले शिकून नोकरीवर लागली. पण ती आपली संस्कृती आणि परंपराच विसरलीत. कालौघात आपल्या परंपरेचे विस्मरण होऊ नये म्हणून धनगर समाजाचा संघर्ष सुरू आहे. याच आशयावर हे नाट्य बेतले आहे. माळरानावर गुरे चारणाऱ्या धनगराचा मुलगा शिकून शहरात जातो.
माळरानावार राहणाऱ्या बापाला मात्र शहरात मुलाकडे आश्रयाला जायचे नसते. मुलाचा मात्र माळरान, गुरे चारणे या बाबींना विरोध असतो.माणसाशी माणसारखे संवेदनशीलतेने जगण्याची मजा गावातच त्याला वाटते.
नात्यांमधल्या अंतर्विरोधातून परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या या दीर्घांकाचे दिग्दर्शन गिरीश पांडे यांनी कौशल्याने केले आहे.
निर्मिती सूत्रधार, नेपथ्य अमोल निंबर्ते. प्रकाशयोजना संदीप डाबेराव यांची होती. यातील नृत्य स्वप्नील भरणे, वेशभूषा मनीष देव, सूत्रसंचालन मोहन काळबांडे, संगीत अश्विन महल्ले, रंगभूषा सचिन सातफळे यांची होती. या सर्व नव्या कलावंतांना रंगमंच मिळवून देण्याचे कार्य संजीवनी चौधरी यांनी केले. नाटकात प्रशांत खडसे, बिस्मार्क भिवगडे, रोहित घांगरेकर, रिकेशकुमार, अंकित कुसरे, ओंकार देव, स्वप्नील भरणे, अपूर्व नेरकर, गौरव घरोटे, श्रीकांत सोनटक्के, हर्षद मानकर, कौस्तुभ वंदे, नितीन शिंगणे, प्रज्ञेश बेगडे आणि स्नेहा अहेर, प्रीती बुधकोंडवार यांनी भूमिका केली. याप्रसंगी शाहीर कलाकार परिषदेचे अध्यक्ष धर्मदास भिवगडे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. (प्रतिनिधी)