दीक्षाभूमीवर आज धम्मदीक्षा समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2016 02:59 IST2016-05-21T02:59:39+5:302016-05-21T02:59:39+5:30
तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त (वैशाख पौर्णिमा) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर बुद्ध जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

दीक्षाभूमीवर आज धम्मदीक्षा समारंभ
बुद्ध जयंती : शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर : तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त (वैशाख पौर्णिमा) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर बुद्ध जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत शनिवारी दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय शहरात विविध संस्थांतर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दीक्षाभूमीवर शनिवारी सकाळी ६.३० वाजता बुद्धवंदना व उपोसथ व्रत ग्रहण होईल. ८ वाजता सामूहिक धम्मदीक्षा सोहळा होईल. सकाळी ११ वाजता संघदान व भोजनदान होईल. सायंकाळी ६.३० वाजता बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित नाटिका सादर केली जाईल. सायंकाळी ७.३० वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भदंत विमलकीर्ती गुणसिरी व भदंत आनंद हे धम्म प्रवचन देतील. (प्रतिनिधी)
बुद्धनगरात संगीतमय बुद्ध पहाट
बुद्ध जयंतीनिमित्त शनिवारी कामठी मार्गावरील बुद्धनगरातील बुद्धपार्क येथे पहाटे ५.१५ वाजता ‘बुद्ध पहाट’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध् गायिका छाया वानखेडे-गजभिये आणि सहकारी यानिमित्ताने बुध्द व सोबतच भीमगीते सादर करतील. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे प्रमुख अतिथी राहतील.त्यांच्यासोबत या कार्यक्रमात प्रीती धाकडे, प्रीती गजभिये, श्याम जैन, मिलिंद जिभे गीत सादर करतील. त्यांना राहुल देशमुख (तबला), नागेश गेडाम(की बोर्ड), उल्हास चिटमुलवार (आॅक्टोपॅड), विनीत (ढोलक), लेखराज वंजारी (गिटार), राज चौधरी (हार्मोनियम व निवेदन) वाद्यवृंदाची साथसंगत असेल.
ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्धवंदना
कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त शनिवारी सकाळी ६ वाजता पूज्य भिक्षु संघाच्या प्रमुख उपस्थितीत परित्राण पाठ व विशेष बुद्धवंदना आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ८ ते ९ या वेळात सामूहिक विपश्यना करण्यात येईल. सकाळी ११ वाजता भिक्षु संघाला भोजनदान देण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते ड्रॅगन पॅलेस टेम्पलपर्यंत शांती मार्च काढण्यात येईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, नगराध्यक्षा रिजवाना कुरैशी प्रामुख्याने उपस्थित राहतील.