देवश्री कडू विदर्भात मुलीत अव्वल
By Admin | Updated: June 7, 2015 03:08 IST2015-06-07T03:08:02+5:302015-06-07T03:08:02+5:30
सध्या शिक्षण क्षेत्रात फार मोठी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे खूप अभ्यास करू न चालत नाही, तर त्यात सातत्य असले पाहिजे.

देवश्री कडू विदर्भात मुलीत अव्वल
नागपूर : सध्या शिक्षण क्षेत्रात फार मोठी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे खूप अभ्यास करू न चालत नाही, तर त्यात सातत्य असले पाहिजे. नियोजनबद्ध अभ्यासातून यश निश्चित मिळते, असा विश्वास एमएच-सीईटी परीक्षेत १९७ गुणांसह विदर्भातून मुलींमधून अव्वल स्थान पटकाविणाऱ्या देवश्री राजू कडू हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
देवश्री म्हणाली, आपण कधीही १० ते १५ तास अभ्यास केलेला नाही. केवळ रोज ७ ते ८ तास अभ्यास केला आहे. परंतु मागील दोन वर्षांत त्यात खंड पडू दिला नाही.
देवश्री ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजची विद्यार्थिनी असून तिला बारावीत ९४.३ टक्के गुण मिळाले आहे. ती म्हणाली, लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्यानुसार तयारी केली. दहावीमध्ये ९७.९ टक्के गुण मिळाले. यानंतर बारावीसह एमएच-सीईटी परीक्षेचे नियोजन केले. त्यानुसार मागील दोन वर्षे तयारी केली. मात्र कधीही रात्र जागली नाही. रोज हसतखेळत अभ्यास केला. एमएच-सीईटीची तयारी करताना आई-वडिलांची प्रेरणा फार महत्त्वाची ठरली. देवश्रीची आई वैशाली कडू या एमएस्सी, बीएड. असून त्यांनी मुलीला वेळोवेळी मार्गदर्शन केले. शिवाय खाजगी शिकवणी वर्गाचाही फायदा झाल्याचे ती म्हणाली. देवश्रीचे संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित असून तिचे आजोबा १९५० चे पदव्युत्तर होते. शिवाय वडील राजू कडू मेघे गु्रपमध्ये नोकरी करतात. देवश्रीला आयुष्यात एक यशस्वी न्यूरोलॉजिस्ट बनायचे आहे. (प्रतिनिधी)