देवेंद्र करणार महाराष्ट्राला नंबर वन -नितीन गडकरी
By Admin | Updated: October 29, 2014 00:43 IST2014-10-29T00:43:50+5:302014-10-29T00:43:50+5:30
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत

देवेंद्र करणार महाराष्ट्राला नंबर वन -नितीन गडकरी
नागपूर : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात नंबर वन होईल, अशी विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पत्रकारांसोबत बोलत होते.
फडणवीस यांना दूरदृष्टी आहे. त्यांच्या नेतृत्वात मागासलेला विदर्भ, कोकण व मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. नागपुरातील मिहान प्रकल्पाला गती मिळेल. राज्याची आर्थिक प्रगती होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. देवेंद्रला राजकारणात मी आणले. त्याने स्वकर्तृत्वाने राज्याचे नेतेपद मिळविले. फडणवीस राज्याला स्थिर सरकार देतील. त्यांची कारकीर्द यशस्वी होवो, अशा आमच्या शुभेच्छा असल्याचे गडकरी म्हणाले.
एकनाथ खडसे नाराज नाहीत. आज दुपारी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली. त्यांनीच नेतेपदासाठी फडणवीस यांचे नाव सुचविले. गेल्या १५ वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकाळात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल. विदर्भासाठी ही मानाची बाब ठरणार असल्याचे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)