फडणवीस यांची नागपूरला दिवाळी भेट, रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार; ४८७ कोटींचे कार्यादेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 10:41 AM2022-10-19T10:41:11+5:302022-10-19T10:42:51+5:30
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्जित होणार स्थानक : नागपूर ते मुंबई ‘हायस्पीड ट्रेन’च्या प्रस्तावावरदेखील चर्चा
नवी दिल्ली/ नागपूर : केंद्र सरकारने नागपूरकरांना दिवाळी भेट दिली असून नागपूर रेल्वेस्थानकाचा कायापलट करणारी योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीत मार्गी लागली आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास आणि आधुनिकीकरणासाठी ४८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्या कार्यदेशाची प्रत रेल्वेमंत्र्यांनी फडणवीस यांना मंगळवारी सुपूर्द केली. महत्त्वाची बाब म्हणजे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडून ‘हायस्पीड ट्रेन’ सुरू करण्याच्या प्रस्तावावरदेखील केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून विचार सुरू आहे. रेल्वे मंत्रांसोबत भेटीनंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, की नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास व आधुनिकीकरणासाठी अखेर कार्यादेश जारी झाले आहेत. यामुळे रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण होतील व स्थानक आणखी भव्य होईल.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या योजनेला हेरिटेज संवर्धन समितीने मान्यता दिली आहे. गर्दीच्या वेळेत क्रॉस-मूव्हमेंट आणि गोंधळ कमी करणे तसेच रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची कोंडी होऊ नये, यावर यात भर देण्यात येणार आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर हे होतील बदल
- हेरिटेज दर्जा असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकाच्या आजूबाजूच्या इमारती पाडून स्टेशन भव्य बनवण्यात येणार आहे.
- येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असतील.
- गाड्यांचे फलाट अचानक बदलल्यानंतर होणारी धावपळ टाळण्यासाठी प्लॅटफॉर्मवर ओव्हरहेड कॉन्कोर्स बांधण्यात येणार आहेत.
- रेल्वेस्थानक प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल.
- वेटिंग रुम्स व बसण्याची क्षमता वाढणार.
- दुचाकी व चारचाकी पार्किंगची क्षमतादेखील वाढणार.
- ३० लिफ्ट्स व २६ एस्केलेटर बांधणार
- स्थानकावरील प्रवासी क्षमता ९ हजार ७०० पर्यंत नेणार.
रेल्वेमंत्र्यांनी दिली कार्यादेशाची प्रत
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यादेशाची प्रत दिली. हे मोठे पाऊल असून, यामुळे रेल्वेस्थानकात प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. सामाजिक-आर्थिक विकासालाही गती मिळेल. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. तसेच नागपूरकरांच्या वतीने रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले.
हायस्पीड ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा
नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वेचे उद्घाटन लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गालगत हायस्पीड ट्रेन आणि हायस्पीड कार्गो ट्रेनच्या प्रस्तावालाही वेग आला आहे. याबाबत रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. याबाबत सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.