विद्यार्थ्यांचा विकास हीच ‘भवन्स’ची विशेषता
By Admin | Updated: November 11, 2015 02:36 IST2015-11-11T02:36:17+5:302015-11-11T02:36:17+5:30
आधुनिक शिक्षणप्रणालीसोबतच विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचेदेखील ज्ञान असले पाहिजे. भारतीय विद्या भवनमध्ये हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते

विद्यार्थ्यांचा विकास हीच ‘भवन्स’ची विशेषता
देवेंद्र फडणवीस : भारतीय विद्या भवनच्या कोराडी शाखेचे भूमिपूजन
नागपूर : आधुनिक शिक्षणप्रणालीसोबतच विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचेदेखील ज्ञान असले पाहिजे. भारतीय विद्या भवनमध्ये हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे गुणवत्ता हाच प्रवेशाचा निकष असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जातो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय विद्या भवन शाळेच्या नागपुरातील पाचव्या शाखेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
कोराडीतील नांदा येथे शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या १० एकर जमिनीवर ही शाळा उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.कृपाल तुमाने, आ.सुनील केदार, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, ‘एमएसईबी’चे संचालक विश्वास पाठक, माजी आमदार आशीष जयस्वाल, कोराडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना मैंद हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय विद्या भवनच्या नागपूर केंद्राचे अध्यक्ष व माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी भूषविले.
आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा असे पालकांचे स्वप्न असते. कोराडी परिसरातील मुलांना दर्जेदार शाळेत शिकण्याची संधी मिळणार आहे. यातील ६० टक्केहून अधिक जागा या स्थानिक रहिवासी तसेच ‘महाजेन्को’तील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी असतील असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. मुलांना या शाळेच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. कोराडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होणार असल्यामुळे शाळेला वेगळे महत्त्व प्राप्त होईल असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. बनवारीलाल पुरोहित यांनी प्रास्ताविकादरम्यान शाळेची माहिती दिली.
यावेळी भारतीय विद्या भवनच्या नागपूर केंद्राच्या कार्यकारी समितीतील सदस्य अॅड.के.एच देशपांडे, सचिव डॉ.सुनंदा सोनारीकर, कोषाध्यक्ष के.एम.अग्रवाल, डॉ.विनय नांगिया, राजेंद्र पुरोहित, पद्मिनी जोग, राकेश पुरोहित, डॉ.पन्ना आखानी, प्रा.क्यू.एच.जीवाजी, डॉ.ए.के.मुखर्जी, संचालक टीजीएल अय्यर, सहसंचालक राजा अय्यर, कुलसचिव विजय ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते. शिवाय भवन्सच्या विविध शाखांमधील प्राचार्या अन्नपूर्णी शास्त्री, अंजू भुतानी , पार्वती अय्यर आणि जानकी मानी यांचीदेखील उपस्थिती होती. उमा दुराईराजन यांनी संचालन केले तर राजी श्रीनिवासन यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)