कोरोना रुग्णांची जबाबदारी ठरवा, अन्यथा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST2021-04-04T04:09:21+5:302021-04-04T04:09:21+5:30
नागपूर : कोरोना रुग्णांची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. यामुळे त्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (एमओ) हे रुग्ण पाहायला हवे. मेयो हे ...

कोरोना रुग्णांची जबाबदारी ठरवा, अन्यथा संप
नागपूर : कोरोना रुग्णांची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. यामुळे त्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (एमओ) हे रुग्ण पाहायला हवे. मेयो हे ‘टर्शरी केअर सेंटर’ असल्याने निवासी डॉक्टर यातील केवळ गंभीर रुग्ण सांभाळतील. गेल्या एक वर्षापासून निवासी डॉक्टर २४ तास कोविड ड्यूटी करीत आहे. शिक्षण व प्रशिक्षण मागे पडले आहे. यामुळे कोरोना रुग्णांची जबाबदारी ठरवा, अशा आशयाचे निवेदन शनिवारी मेयो मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना दिले. यावर लवकर निर्णय न घेतल्यास संपाचा इशाराही त्यांनी दिला.
मेयो ‘मार्ड’चे सल्लगार सदस्य डॉ. गणेश पारवे यांनी सांगितले, मागील वर्षी आरोग्य विभागाकडून कोरोना रुग्ण सांभाळण्यासाठी सुमारे ७५ ‘एमओ’ दिले होते. जेव्हा रुग्णसंख्या कमी होऊ लागली तेव्हा चार टप्प्यात ‘एमओ’ काढून टाकले. कोरोना रुग्णांची जबाबदारी निवासी डॉक्टरांवर आली. यावर्षी ‘एमओ’ उपलब्ध झाले नाही. निवासी डॉक्टर हे टर्शरी केअर सेंटर सांभाळण्यासाठी असल्याने आरोग्य विभागाने कोरोनाच्या सामान्य रुग्णांची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी आहे.
मागील वर्षी शिक्षण झालेच नाही. तरीही शिक्षणाची फी भरण्यास सांगितले जात आहे. २४ तास बाधितांच्या सेवेत राहूनही निकृष्ट दर्जाचा पीपीई किट पुरविल्या जातात. कोरोना रुग्णामुळे मेयोमध्ये ‘थेसीस’ करण्यास इतर रुग्ण मिळत नाही. याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात मेयो ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. रजत अग्रवाल, सरचिटणीस डॉ. आशिष केंद्रे, डॉ. आसीफ पटेल, डॉ. गणेश पारवे, डॉ. अद्वैत मुळे उपस्थित होते.