तोतया पोलिसांचा हैदोस
By Admin | Updated: October 11, 2015 03:22 IST2015-10-11T03:22:07+5:302015-10-11T03:22:07+5:30
उपराजधानीतील विविध भागात शनिवारी सकाळी तोतया पोलिसांनी हैदोस घातला.

तोतया पोलिसांचा हैदोस
वृद्धांचे दागिने लुटले : नंदनवन, अजनीत गुन्हे
नागपूर : उपराजधानीतील विविध भागात शनिवारी सकाळी तोतया पोलिसांनी हैदोस घातला. अवघ्या पाऊण तासात दोन वृद्धांचे १ लाख रु. किंमतीचे दागिने आरोपींनी लंपास केले. नंदनवन आणि अजनी परिसरात या घटना घडल्या.
हसनबागमधील एलआयजी कॉलनीत राहणारे वल्लभदास भिकचंद राठी (वय ८०) हे शनिवारी सकाळी ९.३० वाजता नंदनवन कॅनल रोडने पायी जात होते. अमोल बिल्डीग समोर ३५ ते ४० वयोगटातील दोन आरोपी मोटारसायकलने त्यांच्याजवळ आले. आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करून समोर लुटमारीच्या घटना घडल्याची भीती दाखवत त्यांनी राठी यांच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या रुमालमध्ये ठेवण्यास सांगितल्या. त्यानंतर राठी यांचे लक्ष विचलित करून आरोपींनी त्यांना रुमाल देऊन अंगठ्या लंपास केल्या. काही वेळेनंतर राठी यांनी रुमाल पाहिला तेव्हा त्यात अंगठ्या नव्हत्या. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवनचे पीएसआय आर.पी. राऊत यांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी राठी यांच्या अंगठ्यांची किंमत २९ हजार रुपये नोंदवली आहे.
या घटनेच्या पाऊण तासापूर्वी सुयोगनगर चौकातही अशीच घटना घडली. सेवकचंद्र दगडुजी डोहे (वय ६७, राजगृह निवास, सुयोग नगर) हे आपल्या घरी जात असतांना ३० ते ४० वयोगटातील दोन आरोपींनी त्यांना रोखले.
आम्ही सीआयडीचे पोलीस आहोत, अशी बतावणी करून यापूर्वी परिसरात झालेल्या चोरीचा तपास करीत आहोत. तुम्ही स्वत:ची सुरक्षा कधी करणार, असा सवाल करीत डोहे यांना त्यांची सोनसाखळी, २ अंगठ्या असा ६८ हजारांचा ऐवज काढून ठेवा म्हटले.
हे दागिने घेऊन आरोपी पळून गेले. अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. या दोन्ही घटनांमधील साम्य बघता आरोपी एकच असावे, असा पोलिसांचा कयास आहे. (प्रतिनिधी)