रेल्वे प्रवासातील ओळखीने केले उद्ध्वस्त
By Admin | Updated: December 4, 2015 03:14 IST2015-12-04T03:14:15+5:302015-12-04T03:14:15+5:30
रेल्वे प्रवासात झालेल्या एका ओळखीचा गैरफायदा घेत एका विवाहितेला उद्ध्वस्त करणाऱ्या एका ठगबाज तरुणाचा ...

रेल्वे प्रवासातील ओळखीने केले उद्ध्वस्त
न्यायालय : रूमील शर्माचा जामीन अर्ज फेटाळला
नागपूर : रेल्वे प्रवासात झालेल्या एका ओळखीचा गैरफायदा घेत एका विवाहितेला उद्ध्वस्त करणाऱ्या एका ठगबाज तरुणाचा जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. रूमील धरमवीर शर्मा (२८), असे आरोपीचे नाव असून तो वाठोड्याच्या महाकाली अपार्टमेंट येथील रहिवासी आहे.
पीडित महिला ही २९ वर्षांची असून सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. २०१४ मध्ये ही महिला मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून नागपूरला जाण्यासाठी रेल्वेत बसली होती. प्रवास सुरू होताच डब्यातच तिची रूमीलसोबत ओळख झाली होती. रूमील हा एखाद्या चित्रपटातील हिरोसारखा दिसत होता. आपल्या बोलण्याने तो कुणालाही भुरळ घालत होता. बेरोजगारांना व्यवसाय आणि नोकरी मिळवून देण्यासाठी आपली संस्था सतत प्रयत्न करीत असते, असे तो सांगत होता.
हळूहळू या दोघांमध्ये ओळख होऊन मैत्री झाली. नागपुरात परतल्यानंतर दोघेही एकमेकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटू लागले होते. अनैतिक संबंध फुलू लागले होते. रूमील हा पीडित महिलेच्या घरी जाऊन जबरदस्तीने तिच्याशी लैंगिक चाळे करायचा. त्याने पाच-सहा वेळा चाळे केले. तिचे अश्लील छायाचित्र काढून अश्लील व्हिडिओ चित्रफितही तयार केली होती. तो तिला सतत ब्लॅकमेलही करू लागला होता. तो तिला पैसेही मागू लागला होता. एकदा तिने स्वत:चे मंगळसूत्र विकण्यासाठी रूमील याला ज्वेलर्सच्या दुकानात नेले होते. परंतु ज्वेलर्सने मंगळसूत्र घेण्यास नकार दिला होता.
२४ आॅक्टोबर २०१५ रोजी रूमील हा पीडित महिलेच्या घरी असताना पैशाच्या मोबदल्यात त्याने या महिलेवर बलात्कार केला होता. तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित समाजात प्रसारित करण्याची तसेच तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन तो या महिलेकडून पैसे उकळत होता आणि शरीर संबंधही प्रस्थापित करीत होता.
तिने त्याच दिवशी केलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६, ३८८, ५०६ (ब) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपीला तातडीने अटकही करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
आरोपीच्या उलट्या बोंबा
आरोपी रूमील याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. संबंधित महिलेने आपणाविरुद्ध कुणाच्या तरी प्रभावाखाली तक्रार नोंदवली. आमच्यामध्ये केवळ मैत्रीचे संबंध होते. या महिलेने आतापर्यंत मोठी रक्कम उसनवारीने घेतलेली आहे. जेव्हा-जेव्हा तिला पैशाची गरज भासत होती, तेव्हा आपण तिला पैसे देत होतो. पैसे थकीत असूनही तिला मदत केली. आपण पैसे परत मागितले असता तिने आपणाविरुद्ध खोटी तक्रार नोंदवली.
प्रकरण गंभीर
हे प्रकरण गंभीर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास येताच तसेच तपास प्राथमिक स्तरावर असल्याने, जामीन मिळताच आरोपी पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील वर्षा सायखेडकर, तर आरोपीच्या वतीने अॅड. जलतारे यांनी काम पाहिले.