देशमुखांचा केदारांवरून मुख्यमंत्र्यांवर नेम
By Admin | Updated: June 24, 2014 01:01 IST2014-06-24T01:01:31+5:302014-06-24T01:01:31+5:30
जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आ. सुनील केदार यांना पाठीशी घालत असल्याचा मुद्दा समोर करीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला.

देशमुखांचा केदारांवरून मुख्यमंत्र्यांवर नेम
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : केदारांना पाठीशी घालताहेत
नागपूर : जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आ. सुनील केदार यांना पाठीशी घालत असल्याचा मुद्दा समोर करीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला. केदार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी चुकीच्या पद्धतीने हाताळले. हा मुख्यमंत्र्यांचा राजकीय भ्रष्टाचार आहे, असा आरोप करीत देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दोन दिवसांपूर्वी दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू होत्या. अशात आज देशमुख यांनी केदार प्रकारणाचा आधार घेत मुख्यमंत्र्यांमा टार्गेट केले. देशमुख म्हणाले, आ. केदार यांनी १२ वर्षांपूर्वी जिल्हा बँकेत १५० कोटींचा घोटाळा केला. चौकशीत ते सिद्ध झाले. घोटाळ्याची रक्कम सरकारने भरावी, यासाठी केदारांनी खूप प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांना धमकाविण्याचे काम केले. गरीब मुख्यमंत्र्यांनी घाबरून सहकार खात्याची चौकशी संथ केली. आता या केसमध्ये तज्ज्ञ वकिलाकडून काढून दुसऱ्याच वकिलाची नियुक्ती केली. मुख्यमंत्र्यांनी कर्तव्य पार पाडावे. केदारांची संपत्ती विकून घोटाळ्याची रक्कम वसूल करावी. खटला जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष अधिकारी नेमावा, अशी मागणी त्यांनी केली. घोटाळ्यामुळे शेतकरी, ठेवीदार, पेन्शनर्स, पगारदारांचे हाल झाले. त्यामुळे आता अशा भ्रष्ट व्यक्तीला मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे तिकीट देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)