अत्याचारी समुपदेशकावर कठोर कारवाई करण्याचे उपसभापतींचे निर्देश
By योगेश पांडे | Updated: January 16, 2025 23:44 IST2025-01-16T23:43:09+5:302025-01-16T23:44:15+5:30
हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील समुपदेशक विजय घायवट याने मागील नऊ-दहा वर्षांत करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

अत्याचारी समुपदेशकावर कठोर कारवाई करण्याचे उपसभापतींचे निर्देश
नागपूर : उपराजधानीतील एका समुपदेशकाने अल्पवयीन मुली व तरुणींच्या लैंगिक छळवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. ‘लोकमत’ने लावून धरलेल्या या प्रकरणाची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीदेखील दखल घेतली असून आरोपीवर कठोर कारवाई करत त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील समुपदेशक विजय घायवट याने मागील नऊ-दहा वर्षांत करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका महिलेने तक्रार दाखल केल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी या एका तक्रारीच्या आधारे अजून तीन फिर्यादींचा शोध घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपसभापतींनी नागपूर पोलिस आयुक्तांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्या
संबंधित प्रकरणातील सर्व आरोपी यांना कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी. मागील नऊ-दहा वर्षांपासून आरोपीकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याने याबाबत सबळ पुरावे संकलित करण्यात यावेत व लवकरात चार्जशीट दाखल करण्यावर भर द्यावा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी शासकीय पंचांची नियुक्ती करून तपासामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जलदगती न्यायालयात प्रकरण न्यावे
साक्षीदार सुरक्षा कायद्यांतर्गत संबंधित पीडित महिला साक्षीदार यांना योग्य संरक्षण पुरवण्याबाबत पोलिसांनी पावले उचलावे. तसेच पीडित महिलांच्या नावांबाबत गोपनीयता राखण्यात यावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयासमोर चालवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने अनुभवी व निष्णात सरकारी वकील नियुक्त करण्यात यावेत. पीडित महिलांचे योग्य समुपदेशन व्हावे यासाठी तरतूद करण्याची सूचनादेखील त्यांनी केली आहे.