उपमहापौर पदावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

By Admin | Updated: March 2, 2016 03:13 IST2016-03-02T03:13:25+5:302016-03-02T03:13:25+5:30

राज्यात युतीचे सरकार असल्याने नागपूर महापालिकेतील उपमहापौरपद शिवसेनेला मिळावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे तर आगामी निवडणूक विचारात घेता हे पद भाजपकडेच असावे,

Deputy Mayor's post from BJP-Shiv Sena to Rasikichchh | उपमहापौर पदावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

उपमहापौर पदावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

महापालिकेतील राजकारण तापले : शिवसेनेची मोर्चेबांधणी
नागपूर : राज्यात युतीचे सरकार असल्याने नागपूर महापालिकेतील उपमहापौरपद शिवसेनेला मिळावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे तर आगामी निवडणूक विचारात घेता हे पद भाजपकडेच असावे, अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी घेतल्याने उपमहापौर पदावरून भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
गेल्या निवडणुकीत उपमहापौर पद शिवसेनेला देण्यासंदर्भात सहमती झाली होती. परंतु केवळ सहा नगरसेवक निवडून आल्याने शिवसेनेला उपमहापौर पद देण्याला भाजप नगरसेवकांनी विरोध केला होता. भाजपच्या जैतुनबी अशफाक अंसारी यांना उपमहापौर करण्यात आले होते. त्यानंतर नागपूर विकास आघाडीतील अपक्ष नगरसेवक मुन्ना पोकुलवार यांना उपमहापौर करण्यात आले. परंतु ते या पदावर संतुष्ट नव्हते. त्यामुळे त्यांना स्थायी समितीवर घेण्यात आले आहे. त्यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा महापौरांकडे सोपविला आहे.
पुढील वर्षात निवडणुका असल्याने उपमहापौर पद शिवसेनेकडे असावे, यासाठी शिवसेना आग्रही असून बंडू तळवेकर यांनी यासाठी प्रयत्न चालविले आहे. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहे. परंतु याची माहिती मिळताच भाजप नगसेवकांनी याला उघड विरोध दर्शविला आहे.
महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांचे दोन गट आहेत. विधानसभा निवडणुकीत माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांना मदत केल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे व शीतल घरत यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दुसरीकडे स्थायी समितीसाठी शिवसेनेचे नगरसेवक जगतराम सिन्हा यांनी पक्षाचे गटनेते किशोर कुमेरिया यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेत बंडू तळवेकर व अलका दलाल हे दोघेच शिल्लक आहे.
उपराजधानीत शिवसेनेचे अस्तित्व कायम असावे, यासाठी पक्षाच्या काही नगरसेवकांच्या जोरावर पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यातील युती विचारात घेता महपालिकेतील उपमहापौर पदावर दावा करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.(प्रतिनिधी)

उपमहापौर भाजपचाच
आगामी निवडणुका विचारात घेता अपक्ष गटाला डावलून उपमहापौरपद शिवसेनेला देण्याचा भाजपच्या काही नेत्यांचा विचार आहे. परंतु शिवसेनेला उपमहापौरपद देण्याला भाजप नगरसेवकांचा विरोध आहे. पक्षाचाच उपमहापौर असावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपचाच उपमहापौर होणार असल्याचा दावा महापालिकेतील भाजपच्या एका नेत्याने केला आहे.

Web Title: Deputy Mayor's post from BJP-Shiv Sena to Rasikichchh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.