नागपूर : गंभीर स्वरुपाचे गुन्हे करून समाजामध्ये स्वत:विषयी दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराला नागपूर शहरातून हद्दपार करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला. तसेच, या आदेशाविरुद्ध गुन्हेगाराने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.
न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला. सुनील ऊर्फ बंटी उमाकांत कुरील (३१) असे गुन्हेगाराचे नाव असून तो पाटणसावंगी येथील रहिवासी आहे. पोलीस उपायुक्त-झोन-२ यांनी २७ मे २०१९ रोजी संबंधित आदेश जारी केला. त्याविरुद्ध कुरीलने सुरुवातीला विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. ते अपील २३ ऑक्टोबर २०१९ रोजी खारीज करण्यात आले. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कुरीलने २०१६ ते २०१८ या काळात अंबाझरी व सीताबर्डी पोलिसांच्या हद्दीत महिलांची छेड काढणे, मारहाण व दुखापत करणे इत्यादी गंभीर गुन्हे केले. त्याच्याविरुद्ध दोन गोपनीय साक्षीदारांचे बयान पोलिसांकडे आहे. याशिवाय इतर पुरावे लक्षात घेता हद्दपारीचा आदेश वैध ठरवण्यात आला.