शिक्षण विभागाचा कारवाईत खोडा !
By Admin | Updated: April 3, 2016 03:52 IST2016-04-03T03:52:17+5:302016-04-03T03:52:17+5:30
गोरगरिब विद्यार्थ्यांच्या खिचडीत भ्रष्टाचाराचे लोणी शिजविणाऱ्या खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात शालेय पोषण आहारात ...

शिक्षण विभागाचा कारवाईत खोडा !
कलोडे विद्यालयातील खिचडी प्रकरण : चौकशी अहवालानंतर वाढले ‘गूढ’
जितेंद्र ढवळे नागपूर
गोरगरिब विद्यार्थ्यांच्या खिचडीत भ्रष्टाचाराचे लोणी शिजविणाऱ्या खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात शालेय पोषण आहारात गोलमाल असल्याचा ठपका जि.प.च्या शालेय पोषण आहार विभागाने ठेवला आहे. मात्र याप्रकरणी दोषी मुख्याध्यापिका रजनी कलोडे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने (माध्यमिक) खोडा टाकला आहे. इकडे नियमानुसार कारवाई सुरू असून प्रशासकीय कामांना अधिक वेळ लागतो, अशी भूमिका शिक्षणाधिकारी ओमप्र्रकाश गुढे यांनी घेतली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात कुणी खडे टाकले का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
शालेय पोषण आहार वाटपासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने व्यापक दिशानिर्देश दिले आहेत. कलोडे विद्यालयात खिचडी वाटपात अनियमितता आढली. याला शिक्षणाधिकारी क्षुल्लक कारण का समजतात ?
मुख्याध्यापिका रजनी डहाके यांना नोटीस पाठविण्यास विलंब का झाला ?
विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानंतर किती दिवसांनी शालेय पोषण आहार विभागाचे चौकशी पथक कलोडे विद्यालयात गेले ?
शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांच्या पत्राची तत्काळ दखल का घेतली नाही ? ती किती दिवसांनी घेतली ? शिक्षण उपसंचालकांचे आदेश क्षुल्लक प्रकारात मोडतात का ?
शालेय पोषण आहार विभागाच्या अहवालानुसार चौकशीच्या दिवशी विद्यालयाचे कनिष्ठ सहायक तडस रजेवर होते. त्यामुळे २०१४-१५ या वर्षातील दस्तऐवज पाहता आले नाही, असे सांगण्यात आले आहे. चौकशी पथकाला दस्तऐवज उपलब्ध का करून देण्यात आले नाही ? याची शिक्षणाधिकारी गुढे यांनी कधी चौकशी केली का ? दस्तऐवज उपलब्ध करून न देणे, हे क्षुल्लक कारण आहे का ?