कृषी विभागाचा ‘आत्मा’ संकटात!

By Admin | Updated: December 4, 2015 03:19 IST2015-12-04T03:19:12+5:302015-12-04T03:19:12+5:30

कृषिविषयक योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, शेतकऱ्यांना नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व यातून बळीराजा हा सुखी-सुमृद्ध व्हावा,

Department of Agriculture 'soul' in trouble! | कृषी विभागाचा ‘आत्मा’ संकटात!

कृषी विभागाचा ‘आत्मा’ संकटात!

योजना गुंडाळण्याची तयारी : संचालकांचे पत्र जारी
जीवन रामावत नागपूर
कृषिविषयक योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, शेतकऱ्यांना नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व यातून बळीराजा हा सुखी-सुमृद्ध व्हावा, असे गोड स्वप्न दाखवीत राज्य शासनाने मागील १० वर्षांपूर्वी राज्यात सुरू केलेली ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’(आत्मा) ही योजनाच आज गुंडाळण्याची तयारी सुरू झाली आहे. कृषी आयुक्तालयातील संचालक (आत्मा) यांनी अलीकडेच एक पत्र जारी करू न त्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे,‘लोकमत’ ने यासंबंधी महिनाभरापूर्वीच ‘कृषी विभागाचा आत्मा आॅक्सिजनवर’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यावर आता संचालक (आत्मा) यांच्या पत्राने शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य शासनाने २००५-०६ मध्ये ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ (आत्मा) हा स्वतंत्र विभाग सुरू केला होता. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी फौज उभी करून राज्यभरात स्वतंत्र कार्यालये थाटली आहेत. परंतु अवघ्या १० वर्षांत ही संपूर्ण ‘यंत्रणा’ गुंडाळण्याची वेळ का आली? असा सर्वांपुढे प्रश्न उपस्थित झाला आहे.
जाणकारांच्या मते, ‘आत्मा’ ही यंत्रणाच आपले उद्दिष्ट साध्य करण्यात पूर्णत: ‘फेल’ ठरली आहे; शिवाय केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीत कपात करण्यात आली आहे. केंद्र शासनाने २०१५-१६ मध्ये या योजनेसाठी केंद्राचा ६० व राज्याचा ४० टक्के निधी अशी विभागणी केली आहे. यामुळे आता ही योजना राबविण्यासाठी राज्याला ४० टक्के हिस्सा देणे अनिवार्य झाले आहे. शिवाय २०१५-१६ या वर्षासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अजूनपर्यंत आयुक्तालयाकडे कोणताही निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने केंद्राच्या मदतीने या यंत्रणेच्या माध्यमातून सध्या राज्यात राबविण्यात येत असलेले सर्व कार्यक्रम कृषी विभागाच्या नियमित आस्थापनाकडे वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी हा विभाग नावाप्रमाणेच कृषी विभागाचा ‘आत्मा’ म्हणून ओळखल्या जात होता. परंतु आज तोच ‘आत्मा’ ‘व्हेंटिलेटर’वर अखेरच्या घटका मोजू लागला आहे.
कंत्राटी पदभरतीला ब्रेक
कृषी आयुक्तालयातील संचालक (आत्मा) यांनी जारी केलेल्या पत्रातून कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती ताबडतोब थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.
शिवाय सद्यस्थितीत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या चालू कराराचा कालावधी संपल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत संबंधितांना पुनर्नियुक्ती देण्यात येऊ नये, असेही स्पष्ट केले आहे. सोबतच जिल्हास्तरावरील संगणक अज्ञावली रू परेषक या पदाचा कार्यभार कृषी कार्यालयातील लेखा नि लिपिक यांच्याकडे देण्यात यावा, तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापकपदाचा अनुक्रमे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक/कृषी सहायक/कृषी सेवक यांच्याकडे वर्ग करण्यात यावा, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, नागपूर विभागातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठी नुकत्याच काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथील ‘सर्च’ या एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात उमेदवारांकडून मुलाखतीच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्यात आले होते. मात्र चंद्रपूर येथे रुजू झालेल्या काही उमेदवारांचा अपवाद वगळता अजूनपर्यंत कुणालाही नियुक्तीपत्र मिळालेले नाहीत. अशात आता संचालक ‘आत्मा’ यांच्या पत्राने त्या संपूर्ण नियुक्त्यांवर कायमचा बे्रक लावला आहे.

अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
विशेष म्हणजे, ‘आत्मा’ या योजनेचा मागील १० वर्षांत शेतकऱ्यांना फायदा झाला असो की नाही, मात्र कृषी अधिकाऱ्यांना त्याचा नक्कीच भरभरू न लाभ मिळाला आहे. अनेकांना १० वर्षानंतर मिळणारी पदोन्नती २००६ मध्येच मिळाली असून, क्लास-१ चे थेट सुपर क्लास-१ झाले आहेत. शिवाय काही क्लास-२ मधून थेट क्लास-१ च्या श्रेणीत गेले आहेत. त्यापैकी अनेक जण ‘आत्मा’ योजनेतच उच्च पदावर बसले आहेत. परंतु आज त्या सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘आत्म्याला’ कुलूप लागले तर आपले काय? अशी त्यांना आता चिंता भेडसावू लागली आहे. त्यामुळे अनेकांनी आतापासूनच सुरक्षित आणि मलाईच्या ठिकाणी बसण्यासाठी मंत्रालयाचा उंबरठा झिंजविणे सुरू केले असल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: Department of Agriculture 'soul' in trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.