देवळी कला ग्रा.पं.ची निवडणूक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST2021-01-13T04:21:59+5:302021-01-13T04:21:59+5:30
कुही : कुही तालुक्यातील देवळी कला ग्रा.पं.ची निवडणूक रद्द करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केला आहे. या ग्रा.पं.च्या ...

देवळी कला ग्रा.पं.ची निवडणूक रद्द
कुही : कुही तालुक्यातील देवळी कला ग्रा.पं.ची निवडणूक रद्द करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केला आहे. या ग्रा.पं.च्या मतदार यादीत घोळ उघडकीस झाल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य निवडणूक आयोगाने उपरोक्त निर्णय घेतला आहे. तसेच मतदार यादीत चुका करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार देवळी कला येथील मतदार यादीत लेखन दोषामुळे अथवा अनवधानाने मतदार यादी क्रमांक १ ला २ व २ ला १ लिहिल्या गेले. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज सादर केले. मात्र उपरोक्त अनवधानाने झालेली चूक दुरूस्त करण्याची विनंती जिल्हाधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली. ती विनंती रास्त असल्याने राज्य निवडणूक आयोगाने दुरुस्तीला मान्यता दिली. त्यानुसार देवळी कला येथील मतदार यादीत लेखन दोषामुळे अथवा अनवधानाने झालेली चूक दुरुस्त करण्यात आली. मात्र यामुळे पूर्वीच्या यादीतील वॉर्डानुसार ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले त्यांच्या उमेदवारीवर परिणाम होत असल्याची याचिका रामा डोमाजी खेडेकर व इतर तीन उमेदवारांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात दाखल केली.
सदर मागणी योग्य ठरवून वॉर्ड क्रमांक १ व २ येथील मतदार यादी नव्याने तयार करुन सुधारित निवडणूक कार्यक्रम देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांनी केली. त्यानुसार वॉर्ड क्रमांक १ मधील २ जागा (एक अनुसूचीत जाती व एक सर्वसाधारण महिला), वॉर्ड क्रमांक क्रमांक २ मधील दोन जागा (नामाप्र.महिला व सर्वसाधारण), वॉर्ड क्रमांक ३ मधील तीन जागा ( नामाप्र महिला,व सर्वसाधारण गटात-२) असे आरक्षण आहे. मात्र या नव्या दुरुस्तीमुळे निर्मला कवडु रामटेके, सरिता प्रशांत करुटकर व इतरांना इच्छुक वॉर्डात अर्ज सादर करता आले नाही. त्यांची संधी हुकली. या सर्व बाबींचा विचार करुन भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ व महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुक अधिनियम १९५८ व इतर अधिकाराचा वापर करुन देवळी कला येथील आतापर्यतच्या सर्व मतदार यादी व निवडणुकीचे टप्पे रद्द करण्यात आले आहेत.