बच्चू कडूंविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 20:31 IST2018-03-23T20:31:43+5:302018-03-23T20:31:54+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याविरुद्ध चांदूर बाजारमधील खुनी हल्ला प्रकरणात पुढील आदेशापर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली. त्यामुळे कडू यांना अंतरिम दिलासा मिळाला.

बच्चू कडूंविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याविरुद्ध चांदूर बाजारमधील खुनी हल्ला प्रकरणात पुढील आदेशापर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली. त्यामुळे कडू यांना अंतरिम दिलासा मिळाला.
फिर्यादी गोपाल तिरमारे यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी ९ फेब्रुवारी २०१८ रोजी बडू यांच्यासह एकूण पाच आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, १२०-ब, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. तो एफआयआर रद्द करण्यासाठी कडू यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अर्जावर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला. तसेच, चांदूर बाजार पोलीस व फिर्यादी गोपाल तिरमारे यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले.
एफआयआरनुसार, तिरमारे यांनी कडू यांच्याविरुद्ध आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्याचा राग कडू यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना तिरमारे यांच्याविरुद्ध चिथावणी दिली. त्यातून आरोपींनी तिरमारे यांच्यावर त्यांना ठार मारण्याचा उद्देशाने लोखंडी रॉड व इतर शस्त्रांनी हल्ला केल. ही घटना ७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. न्यायालयात कडू यांच्यातर्फे अॅड. फिरदोस मिर्झा व अॅड. अब्दुल सुभान यांनी बाजू मांडली.