रणजित देशमुखांना अवमानना नोटीस
By Admin | Updated: February 4, 2017 02:42 IST2017-02-04T02:42:47+5:302017-02-04T02:42:47+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका शिक्षिकेच्या वेतनासंदर्भातील प्रकरणात विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

रणजित देशमुखांना अवमानना नोटीस
हायकोर्ट : शिक्षिकेच्या वेतनाचे प्रकरण
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका शिक्षिकेच्या वेतनासंदर्भातील प्रकरणात विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री रणजित देशमुख यांना अवमानना नोटीस बजावून ३ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
आशा मालगावे असे शिक्षिकेचे नाव आहे. त्या सुरुवातीला नंदनवन येथील नवजागृती विद्यालयात कार्यरत होत्या. आवश्यक विद्यार्थी नसल्याच्या कारणावरून १९९७ मध्ये विद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आली. त्यानंतर मालगावे यांना न्यायालयाच्या आदेशावरून धंतोलीतील सुळे हायस्कूलमध्ये समायोजित करण्यात आले. २७ आॅक्टोबर २००४ रोजी न्यायालयाने मालगावे यांचे आॅगस्ट-१९९७ ते आॅक्टोबर-२००४ पर्यंतचे वेतन नवजागृती विद्यालयाने द्यावे असा आदेश दिला होता. दरम्यान, या शाळेची इमारत विद्या शिक्षण प्रसारक मंडळाला भाड्याने देण्यात आली होती. परिणामी न्यायालयाने इमारतीच्या भाड्यातून मालगावे यांचे थकीत वेतन देण्याचे निश्चित करून इमारतीचे भाडे न्यायालयात जमा करण्याचा आदेश मंडळाला दिला होता. परंतु, मंडळाने या आदेशाचे पालन केले नाही. मालगावे यांचे १६ लाख ३४ हजार २२४ रुपये वेतन थकीत आहे. त्यामुळे त्यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
पुढील तारखेपर्यंत संबंधित आदेशाचे पालन करण्यास मंडळ मोकळे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मालगावे यांच्यातर्फे अॅड. अरुण पाटील यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)