डेंग्यूने घेतला चिमुकल्याचा बळी
By Admin | Updated: September 20, 2015 03:03 IST2015-09-20T03:03:55+5:302015-09-20T03:03:55+5:30
रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी आलेल्या बहिणीला माहीत नव्हते की ती जेव्हा सासरी जाईल तेव्हा तिच्या काळजाचा तुकडा...

डेंग्यूने घेतला चिमुकल्याचा बळी
नागपूर : रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी आलेल्या बहिणीला माहीत नव्हते की ती जेव्हा सासरी जाईल तेव्हा तिच्या काळजाचा तुकडा सात महिन्याच्या चिमुकला आजार घेऊन येईल. पती, आजोबा आणि अन्य नातेवाईक चिमुकल्याला एका इस्पितळातून दुसऱ्या इस्पितळात नेत होते. धंतोलीच्या एका इस्पितळात अखेर भरती केले. महागडा उपचार केला. परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. डॉक्टरांनी त्याला डेंग्यू झाल्याचे निदान केले होते. विशेष म्हणजे, महापालिकेकडे डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद नाही, तर दुसरीकडे खासगी इस्पितळांमध्ये मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाईकनगर मानेवाडा रहिवासी मनीष शाहू यांचा सात महिन्यांचा चिमुकला ‘सुबू’ असे मृताचे नाव आहे. सुबूची आई कांचन हिचे वडील गणेशलाल शाहू यांनी सांगितले, रक्षाबंधनासाठी कांचन मेकोसाबाग येथील घरी आली होती. मात्र, काहीच दिवसांतच सुबूची प्रकृती खालावल्याने ती आपल्या सासरी परतली. प्रथम मानेवाडा येथील एका इस्पितळात सुबूवर उपचार केला, परंतु तब्येतीत सुधार होत नसल्याने त्याला धंतोलीच्या एका इस्पितळात भरती करण्यात आले होते. येथे त्याला तीन दिवस ठेवल्यानंतर डॉक्टरांनी मेहाडिया चौकातील एका इस्पितळात भरती केले. येथेही तीन दिवस उपचार घेतल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी चिमुकल्याचा मृत्यू झाला.(प्रतिनिधी)