डेंग्यूची माफक दरात तपासणी
By Admin | Updated: November 6, 2015 04:20 IST2015-11-06T04:20:34+5:302015-11-06T04:20:34+5:30
महापालिकेच्या महाल येथील स्व. प्रभाकरराव दटके स्मृती रोगनिदान केंद्रात एलायझा मशीन बसविण्यात आली

डेंग्यूची माफक दरात तपासणी
नागपूर : महापालिकेच्या महाल येथील स्व. प्रभाकरराव दटके स्मृती रोगनिदान केंद्रात एलायझा मशीन बसविण्यात आली असून येथे डेंग्यूची माफक दरात तपासणी केली जाणार आहे. रुग्णांना याचा लाभ होईल, असा विश्वास महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी व्यक्त केला. एलायझा मशीनचे लोकार्पण दटके व आमदार विकास कुंभारे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी दटके बोलत होते.
स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, गांधीबाग झोनच्या सभापती प्रभा जगनाडे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यूची तपासणी करण्याची सुविधा आहे. परंतु या दोन्ही महाविद्यालयात विदर्भ व शेजारच्या भागातील सिरम सॅम्पल तपासण्यासाठी येतात. त्यामुळे तपासणी अहवालाला विलंब होतो. आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या सहकार्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून आठ लाखांचा निधी या मशिनसाठी उपलब्ध करण्यात आला. त्यामुळे एलायझा मशीन लावणे शक्य झाल्याचे दटके म्हणाले. मेयो, मेडिकल रुग्णालयात रुग्णांवर चांगले उपचार होतात. परंतु रुग्णांना शासनाच्या योजनांची माहिती नाही. त्यामुळे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात जातात. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व केन्द्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी रुग्णांच्या उपचाराकडे विशेष लक्ष देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी १ ते ५ वयोगटातील बालकांवर कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा केली असल्याची माहिती विकास कुंभारे यांनी दिली.
यावेळी आरोग्य समितीचे सभापती देवन्द्र्रे मेहर,परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त, महिला व बालकल्याण सभापती रश्मी फडणवीस, जयश्री वाडीभस्मे, सारिका नांदूरकर, लता यादव, शीतल घरत, राजेश घोडपागे, अतिरिक्त आयुक्त नयना गुुंडे , मनोज साबळे, डॉ. स्वाती मटकरी, डॉ. प्रदीप दासरवार, डॉ. जयश्री धोटे, झोनचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील आदी उपस्थित होते. संचालन डॉ. नरेन्द्र बर्हिरवार यांनी तर आभार डॉ. विजय जोशी यांनी मानले.(प्रतिनिधी)
डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यू
डेंग्यूमुळे गेल्या वर्षात व यावर्षी प्रत्येकी एक अशा दोनजणांचा मृत्यू झाला. यावर्षी १६० रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.