नागपुरात कोरोनासोबत डेंग्यूही वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:45 PM2020-07-07T23:45:00+5:302020-07-07T23:45:02+5:30

कोविडवर जसे अद्यापही स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टिबायोटिक किंवा अ‍ॅण्टिव्हायरल औषध नाही, तसेच डेंग्यू आजाराचेसुद्धा आहे. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो.

Dengue is also on the rise in Nagpur along with Corona | नागपुरात कोरोनासोबत डेंग्यूही वाढतोय

नागपुरात कोरोनासोबत डेंग्यूही वाढतोय

Next

सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना डेंग्यूचेही रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. जानेवारी ते जूनपर्यंत नागपूर जिल्ह्यात २९ रुग्ण आणि दोघांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील १६ रुग्ण, एक मृत्यू तर ग्रामीणमध्ये १३ रुग्ण, एक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ग्रामीणमध्ये ९४ रुग्ण आणि तीन मृत्यू होते तर शहरात ६२७ रुग्ण व दोन मृत्यू होते.

कोविडवर जसे अद्यापही स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टिबायोटिक किंवा अ‍ॅण्टिव्हायरल औषध नाही, तसेच डेंग्यू आजाराचेसुद्धा आहे. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. या आजाराला कारणीभूत असलेली ‘एडिस’ मादी डास तिच्या जीवनचक्रात १४ ते २१ दिवसांत साधारणत: ३०० अंडी घालते. या डासांची पैदास पाच एमएल पाण्यातही होते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. जुलै ते सप्टेंबर महिन्यात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. नागपूर ग्रामीणमध्ये या वर्षी झालेला डेंग्यूचा मृत्यू हा संशयित मृत्यू म्हणून नोंद आहे. सध्या कोरोनाचा प्रकोप सुरू असल्याने हा आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात ७२१ रुग्ण, पाच मृत्यू
नागपूर शहरात २०१२ मध्ये पहिल्यांदाच डेंग्यूच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. यावर्षी २३७ रुग्ण व पाच मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर २०१३ मध्ये ही संख्या २४०वर पोहचली. यात दोन मृत्यू होते. २०१४ मध्ये ६०१, २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५, २०१७ मध्ये २००, २०१८ मध्ये ५४३ तर २०१९ मध्ये ६२७ रुग्ण, दोन मृत्यूची नोंद झाली. सात वर्षांतील ही सर्वाधिक नोंद आहे. तर गेल्या वर्षी ग्रामीण भागात ९४ रुग्ण, तीन मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७२१ रुग्ण, पाच मृत्यू होते.

डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्या
मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या प्रमुख दीपाली नासरे म्हणाल्या, डेंग्यूला कारणीभूत असलेल्या एडिस डासावर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. रिकामे डबे, मडकी, नारळाच्या रिकाम्या करवंट्या, चाकांचे टायर्स इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात हे डास लवकर फैलावतात. यामुळे पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. कुलर सुरू असेल तर त्यातील पाणी दर तीन दिवसांनीे बदलायला हवे. दर आठवड्याला त्याचा तळ ब्रशने घासायला हवा. यामुळे चिकटलेली अंडी निघतात. विहीर, पाण्याच्या टाक्यात गप्पी मासे सोडावे. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोविडच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू होऊच नये
डेंग्यूमध्ये रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, यामुळे कोविडसारख्या आजाराचा संसर्ग होण्याची व गुंतागुंत वाढण्याचा अधिक धोका राहतो. डेंग्यू होऊच नये यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तूर्तासतरी डेंग्यू असलेल्या रुग्णाला कोविड झालेला नाही.

 

 

Web Title: Dengue is also on the rise in Nagpur along with Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.