जनसामान्यांच्या परीक्षेत नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:19 IST2017-07-19T02:19:57+5:302017-07-19T02:19:57+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग अतिशय महत्त्वाचा विभाग.

जनसामान्यांच्या परीक्षेत नापास
विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कार्यालयीन वेळेत १० टक्के उपस्थिती : जनमंचच्या पथकाने केली पोलखोल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग अतिशय महत्त्वाचा विभाग. ४ लाख ५७ हजार विद्यार्थ्यांचा कारभार येथून चालतो. अशा महत्त्वाच्या विभागाचे कामकाज किती लेटलतिफ आहे, याची अनुभूती मंगळवारी जनमंचच्या पथकाने केलेल्या पाहणीत आली. विभागाच्या कामकाजाची कार्यालयीन वेळ १० वाजताची असताना, १० टक्केही कर्मचारी कार्यालयात आढळून आले नाही. हीच बाब अधिकाऱ्यांच्या बाबतीतही बघायला मिळाली. निव्वळ वेळेचाच नाही तर अनेक बाबतीत विभागाचा ढिसाळपणा पथकाच्या निदर्शनास आला. या पाहणीत परीक्षा विभागाचा अंदाधुंद कारभार पुढे आला.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा, विविध विभागाची प्रमाणपत्रे, पीएचडीचे संदर्भग्रंथ, पुनर्मूल्यांकनाची कामे या विभागातून होत असतात. अमरावती रोडवर परीक्षा भवनाची भव्य वास्तू आहे. या वास्तूमध्ये वेगवेगळ्या शाखेच्या माध्यमातून कामकाज चालते. परीक्षा भवनाच्या ग्राऊंड फ्लोअरवर कॅश काऊंटर आहे. पहिल्या माळ्यावर सामान्य प्रशासन शाखा आहे. त्याच माळ्यावर व्यावसायिक परीक्षा शाखा आहे. त्याच्यावरच्या माळ्यावर व्हॅल्युएशन विभाग आहे. त्याच माळ्यावर आचार्य पदवी कक्ष आहे. परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या संचालकाचे कार्यालय ग्राऊंड फ्लोअरवर आहे. अशा विविध विभागात सोमवारी जनमंचचे सहसचिव अॅड. मनोहर रडके यांच्या मार्गदर्शनात पाहणी केली. या पाहणीत अशोक कामडी, प्रल्हाद खरसाने, किशोर गुल्हाने, राम आकरे, विठ्ठल जवळकर, टी.बी. जगताप, राजेश किलोर, आशुतोष दाभोळकर, श्रीकांत दाऊद, राहुल झाडे, उत्तम सुळके, बाबा राठोड, गणेश खर्च यांचा समावेश होता. परीक्षा भवनाचे कामकाज सकाळी १० पासून सुरू होत असल्याने, जनमंचचे पथक सकाळी १० वाजता परिसरात पोहचले होते. १० नंतर त्यांनी विविध विभागाची पाहणी केली.
संचालक, परीक्षा मूल्यमापन मंडळ
परीक्षा भवनाच्या संपूर्ण कामकाजावर परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक देखरेख ठेवतात. त्याच्या कक्षापुढे कार्यालयीन वेळेची पाटी लावलेली होती. परंतु जनमंचचे पथक ज्यावेळी कार्यालयात पोहचले, त्यावेळी संचालक डॉ. नीरज खटी हेसुद्धा कार्यालयात उपस्थित नव्हते.
कॅश काऊंटर
विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रमाणपत्र आणि विद्यार्थ्यांशी निगडित असलेला हा कक्ष. सकाळी १० वाजले असताना विद्यार्थी कॅश काऊंटर कक्षात पोहचले होते. कॅश काऊंटरवर नऊ कक्ष आहेत. सकाळी १०.३० वाजतापासून येथील कामकाज सुरू होते. परंतु १०.३० वाजता येथील केवळ दोन काऊंटर सुरू होते.
मूल्यांकन शाखा
परवानगीशिवाय आत येऊ नये, असे बोर्ड लिहिलेल्या या विभागात कामकाजाची वेळ ९.४५ ते ५.४५ अशी लिहिलेली आहे. या विभागात १० कर्मचारी कार्यरत आहे. परंतु येथे तीन कर्मचारी उपस्थित दिसून आले.
आचार्य पदवी कक्ष
कार्यालयाच्या अगदी समोर जुन्या फाईल्सचे गठ्ठे उघड्यावर पडलेले होते. या फाईल्स धूळखात पडल्या होत्या. कार्यालयात वेळेत आलेल्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य होती. उपकुलसचिव उमेश उईकेसुद्धा वेळेत कार्यालयात उपस्थित नव्हते.