ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शन ही हक्काची मागणी - अॅड. अनिल किलोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 15:52 IST2017-08-05T15:52:04+5:302017-08-05T15:52:13+5:30
ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शनची मागणी करणारे देशात तब्बल १४ कोटी लोकं आहेत. त्यांची ही मागणी हक्काची आहे.

ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शन ही हक्काची मागणी - अॅड. अनिल किलोर
नागपूर, दि. 5 - ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शनची मागणी करणारे देशात तब्बल १४ कोटी लोकं आहेत. त्यांची ही मागणी हक्काची आहे. १४ कोटी लोकांची संख्या ही कमी नाही. ही संख्या एखाद्या पक्षाला सत्तेत आणू शकते. तर सत्तेत असणा-यांची सत्ता उलथवू सुद्धा शकते. त्यामुळे सत्ताधा-यांनी आमची मागणी मान्य न केल्यास येत्या २०१९ च्या निवडणुकीत आम्हालाही वेगळा विचार करावा लागले अशा शब्दात सत्ताधा-यांना आमच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ, असा इशारा जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी येथे दिला.
जनमंच आणि निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रेशिमबाग मैदानवार महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला देशभरातील हजारो पेन्शनधारक सहभागी झाले होते. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रा. शरद पाटील व निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे , राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक, प्रभाकर खोंडे, आर.यू. केराम, रमेश पाटील, आयटकचे मोहन शर्मा, भारतीय मजदूर संघाच्या नीता चोबे व्यासपीठावर होते.
अॅड. अनिल किलोर म्हणाले, दिल्लीत आपला आवाज पाहोचवण्यासाठीच या मैदानावर हे महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कारण या मैदानाला लागून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्मृती मंदिर आहे. जवळच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान आहे. आणि आज या दोघांचीही केंद्रात किती ताकद आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या पेन्शनधारकांची एकजुट त्यांना दिसावी म्हणून हे संमेलन येथे भरवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पेन्शन धारकांचे २ लाखा कोटी पैसे सरकारजवळ जमा आहेत. तेच पैसे आपण मागत आहोत. निवडणुकीच्या पूर्वी हजार रुपयात कसे भागणार हा अन्याय आहे, असे म्हणून आपल्या आंदोलनात सहभागी झालेली मंडळी आज सत्तेत आहेत. परंतु अजुनही आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. आम्हाला ९ हजाररुपये पेन्शन हवी अशी मागणी करीत ही मागणी मान्य न झाल्यास निवडणुकीत वेगळा विचार करू असा इशाराही त्यांनी दिला.
केरळचे खासदार एन.के. प्रेमचंद्रन यांनी दिल्लीवरून फोनवर मार्गदर्शन करीत मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्याचे आश्वासन दिले. प्रा. शरद पाटील, रमेश पाटील, प्रकाश पाठक, प्रभाकर खोंडे, प्रकाश येडे यांनी हे आंदोलन आखी तीव्र करण्याचे आवाहन केले. देशभरात ही संघटना मजबुत करावी, असेही सांगितले.