दिल्लीच्या निकालाचे नागपुरातही हादरे
By Admin | Updated: February 11, 2015 02:18 IST2015-02-11T02:18:21+5:302015-02-11T02:18:21+5:30
दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजप- काँग्रेसला दिलेल्या धक्क्याचे हादरे नागपुरातही बसले आहेत. जनता व कार्यकर्त्यांना गृहीत धरता येणार नाही.

दिल्लीच्या निकालाचे नागपुरातही हादरे
नागपूर : दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजप- काँग्रेसला दिलेल्या धक्क्याचे हादरे नागपुरातही बसले आहेत. जनता व कार्यकर्त्यांना गृहीत धरता येणार नाही. पक्षाची ताकद असलेल्या कार्यकर्त्यांना अधिक सन्मान देऊ, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी तर जनतेचे प्रश्न अधिक तीव्रतेने लावून धरू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे म्हणाले, दिल्लीतील पराभव भाजपने स्वीकारला आहे. केंद्रीय नेते या पराभवावर चिंतन करून कारणे शोधतील. पण या निकालापूसन आम्हीही स्थानिक पातळीवर धडा घेण्याची गरज आहे. कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या भरवशावर उभा राहतो. येत्या काळात कार्यकर्त्यांना अधिकाधिक न्याय देण्याची, सन्मान देण्याची भूमिका पक्षाकडून घेतली जाईल. सत्तेत वावरताना नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. एका राज्यात चमत्कार झाला म्हणजे सर्वत्र होईल, असे काही नाही. पण गाफिल राहूनही चालणार नाही. आम्ही वेळीच सावध भूमिका घेऊन कार्यकर्ते व जनतेपर्यंत पोहचून त्यांचा भावना जाणून घेऊ, असेही खोपडे यांनी सांगितले.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्ता बळकावली होती. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. त्याचेच बक्षीस त्यांना मिळाले. काँग्रेसचाही दारुण पराभव झाला. या निकालापासून स्थानिक पातळीवर काँग्रेस धडा घेईल. काँग्रेस पक्ष सामान्य जनतेसाठी लढणारा पक्ष आहे. केजरीवाल यांनीही तेच केले. यापुढे काँग्रेस अधिक तीव्रतेने सामान्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन करेल व जनतेचा विश्वास पुन्हा संपादित करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. बरिएमंच्या नेत्या अॅड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, दिल्लीतील निवडणुकीत जनतेने आपला दिलेला कौल म्हणजे लोकशाहीचा विजय होय. आपचे नेते अभिनंदनास पात्र आहेत. हवेत असणाऱ्या नेत्यांना हा एक धडा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. बसपाचे प्रदेश सचिव व मिडिया प्रभारी उत्तम शेवडे म्हणाले, १४ महिन्यात मोदींचा करिष्मा उतरला. दिशाभूल करण्याची प्रवृत्ती जनतेच्या लक्षात आली. जनतेने जोरात धक्का दिला. येत्या काळात स्थानिक राजकारणावरही याचे परिणाम दिसून येतील, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
काँग्रेसकडून अभिनंदनाची पत्रके
दिल्लीत ‘आप’ने काँग्रेसचाही सफाया केला असताना नागपुरात मात्र काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रके काढून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेस सेवादलाचे नागपूर मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे यांनी केंद्र सरकारला धक्का दिल्याबद्दल केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे तर, शहर काँग्रेसचे सचिव जॉन थॉमस यांनी मोदी सरकारच्या विरोधात जनादेश दिल्याबद्दल दिल्लीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.