दिल्ली जिंकली, कार्यकर्ते जिंकले
By Admin | Updated: February 11, 2015 02:24 IST2015-02-11T02:24:51+5:302015-02-11T02:24:51+5:30
‘आप’च्या कार्यकर्त्यांसाठी ही केवळ नवी दिल्लीचीच नाही तर देशाच्या राजधानीची लढत होती. त्यामुळे ‘आप’ची शक्ती येथे दाखविण्यासाठी ...

दिल्ली जिंकली, कार्यकर्ते जिंकले
मिशन राजधानीला उपराजधानीचे बुस्ट
‘आप’च्या कार्यकर्त्यांसाठी ही केवळ नवी दिल्लीचीच नाही तर देशाच्या राजधानीची लढत होती. त्यामुळे ‘आप’ची शक्ती येथे दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला. दिल्लीत पोहोचल्यावर आमच्यासारखेच इतर कार्यकर्ते पाहून आणखी हुरुप आला आणि दुप्पट उत्साहाने प्रचारकामात लागलो. थंडी, तहानभूक विसरून सर्वांनी प्रचार केला. काही कार्यकर्ते तर चक्क तंबूत राहिले. कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ निकालांमध्ये दिसून आले आहे असे मत ‘आप’चे जिल्हा संयोजक देवेंद्र वानखडे यांनी दिले.
सर्वत्र उत्साह
दरम्यान, ‘न भूतो न भविष्यती’ अशा विजयाचा आनंद उपराजधानीतदेखील साजरा करण्यात आला. सकाळपासूनच ‘आप’चे कार्यकर्ते कार्यालयात एकत्र आले होते. ‘एक्झिट पोल’मध्ये आशादायक कौल मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होताच. मंगळवारी सकाळी जसे जसे ‘ट्रेन्ड’ यायला लागले तशी तशी कार्यकर्त्यांची गर्दी आणखी वाढू लागली. बहुमताचा आकडा ओलांडल्यानंतर तर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. शहरातील सर्व वयोगटातील कार्यकर्ते यावेळी एकत्र आले होते.
विजय रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
दुपारच्या सुमारास ‘आप’तर्फे धंतोली कार्यालयातून ‘विजय रॅली’ काढण्यात आली. लोकमत चौक, व्हेरायटी चौक, बर्डी मेन रोड, कॉटन मार्केट, टिळक पुतळा, अग्रसेन चौक, गांधीबाग, बडकस चौक, कोतवाली, गांधी गेटमार्गे ही ‘विजय रॅली’ काढण्यात आली. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनीदेखील प्रतिसाद दिला. व्हेरायटी चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. शिवाय नागरिकांना मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.