बिहारमध्ये दिल्लीची पुनरावृत्ती होणार
By Admin | Updated: October 5, 2015 02:55 IST2015-10-05T02:55:09+5:302015-10-05T02:55:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठमोठी स्वप्ने दाखविली. मात्र, एकही स्वप्न वास्तवात खरे उतरलेले नाही. ....

बिहारमध्ये दिल्लीची पुनरावृत्ती होणार
सीताराम येचुरी यांचा दावा : भाजपचा हिंदू मतांच्या धु्रवीकरणाचा प्रयत्न
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठमोठी स्वप्ने दाखविली. मात्र, एकही स्वप्न वास्तवात खरे उतरलेले नाही. दिवसेंदिवस मोदींचा मॅजिक कमी होत चालला आहे. लोकसभेच्या निकालानंतर विरोधी पक्ष सिटी बसमध्ये जाण्यापुरता शिल्लक राहिला अशी टीका करणाऱ्या मोदींचा पक्ष दिल्लीच्या निकालात आॅटोने जाण्यापुरताही राहिला नाही. जनता जागरूक झाली आहे. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत दिल्लीची पुनरावृत्ती होईल, भाजपचा पत्ता साफ होईल, असा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी केला.
रिपब्लिकन परिवारातर्फे रविवारी आयोजित संघीकरण विरोधी परिषदेत सहभागी होण्यासाठी येचुरी नागपुरात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना येचुरी यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, १५ महिन्यांपूर्वी आम्ही मोदींबाबत वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. संवैधानिक धर्मनिरेपेक्षा राष्ट्राचे चरित्र बदलण्याचा मोदींचा मुख्य अजेंडा समोर आला आहे. विशिष्ट धर्माविरोधात द्वेष पसरविला जात आहे. मतांच्या राजकारणासाठी, हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी घाणेरडे राजकारण केले जात आहे. बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तणाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींचे मंत्री, खासदार भडकावू वक्तव्ये करतात. मात्र, त्यानंतरही मोदी त्यांना ताकीद देत नाही. यावरून त्यांचेही याला प्रोत्साहन असल्याचे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.\मोदींनी १५ महिन्यात २९ विदेश यात्रा केल्या. मात्र, विदेशातून काय गुंतवणूक आणली हे कळायला मार्ग नाही. मोदींनी मेक इन इंडियाचा नारा देताच नोकिया कंपनीने गाशा गुंडाळला व ३० हजारावर युवर बेरोजगार झाले. काळा पैसा परत आणू व प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करू, असे म्हणणाऱ्या मोदी यांनी १५ महिन्यात परत मिळविलेल्या रकमेचा हिशेब केला तर प्रत्येकाच्या खात्यात फक्त १८ रुपये जमा होतील. एकूणच मोदींनी फसवी स्वप्ने दाखवून नागरिकांची दिशाभूल केली, असा आरोप त्यांनी केला. या वेळी अमृत मेश्राम, मनोहर मुळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नेताजींच्या सर्व फाईली सार्वजनिक करा
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संबंधित फाईल्सवरून भाजपतर्फे राजकारण केले जात आहे. नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला की नाही, हा मुख्य मुद्दा आहे. मात्र, याच्याशी संबंधित एकही फाईल नाही. मात्र, नेताजींशी संबंधित फाईल्सचा आधार घेऊन राजकारण केले जात आहे. निवडणुकीत मते घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे एकदाचे नेताजींशी संबंधित सर्व फाईली सार्वजनिक कराव्या, अशी मागणी येचुरी यांनी केली.
डाव्यांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू
बिहारमध्ये नितीश कुमार सुरुवातीला भाजपसोबतच होते. त्यामुळे त्यांच्या सरकारविरोधातही रोष आहे. सर्वजण नितीशकुमार यांच्यासोबत एकवटले असते तर रोषाचा फायदा भाजपला मिळाला असता. डावेपक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे नाराज असलेले मतदार भाजपकडे न जाता आमच्याकडे येतील व याचे मोठे नुकसान भाजपलाच होईल, असा दावाही त्यांनी केला.