सीमा तपासणी नाक्यांवरील बॅरिकेटस् हटवा
By Admin | Updated: July 24, 2015 02:50 IST2015-07-24T02:50:06+5:302015-07-24T02:50:06+5:30
राज्यातील सीमा तपासणी नाक्यांच्या ठिकाणी महामार्गांवर लावण्यात आलेले बॅरिकेटस् हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ..

सीमा तपासणी नाक्यांवरील बॅरिकेटस् हटवा
हायकोर्टाचे आदेश : महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
नागपूर : राज्यातील सीमा तपासणी नाक्यांच्या ठिकाणी महामार्गांवर लावण्यात आलेले बॅरिकेटस् हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य शासनास दिले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्यातील २२ सीमा तपासणी नाक्यांच्या आधुनिकीकरणाचे काम महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क कंपनीला दिले आहे. या कंपनीने मालवाहू वाहनांची तपासणी करण्यासाठी महामार्गावर बॅरिकेटस् लावले आहेत. यामुळे कार, मोटरसायकल अशा बिगरमालवाहू वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही कृती राष्ट्रीय महामार्ग कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने शासनाला वरीलप्रमाणे आदेश दिले.
यासंदर्भात परमजितसिंग कलसी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. यापूर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने प्रतिज्ञापत्र दाखल करून महामार्गावर बॅरिकेटस् लावणे अवैध असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) यांनी प्राधिकरणच्या उत्तराच्या उलट माहिती दिली होती. महामार्गावर खासगी गाड्यांची तपासणी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेटस् लावले जातात. तपासणी झाल्यानंतर बॅरिकेटस् हटविले जातात, असे त्यांनी सांगितले होते. यामुळे न्यायालयाने प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) यांना व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) न्यायालयात उपस्थित झाले होते.
सीमा तपासणी नाक्यांवर ट्रक, ट्रेलर अशा मालवाहू वाहनांचे वजन व मालाची माहिती संकलित करण्यात येते. महाराष्ट्र मोटर वाहन नियम २२३ (६)अनुसार ट्रक व इतर मालवाहू वाहनांचे वजन करताना मोटर वाहन निरीक्षकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. ८ एप्रिल २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार वाहनाचे वजन करणे, मालाची माहिती नमूद करणे, स्कॅनिंग करणे, पार्किंग इत्यादीसाठी मालवाहू वाहनांकडून प्रक्रिया शुल्क वसूल करायला पाहिजे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ६ वरील कांद्री (ता. रामटेक) व राष्ट्रीय महामार्ग ४७ वरील खुर्सापार (ता. सावनेर) येथे आधुनिक सीमा तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. एस. एस. ढेंगळे तर, ‘एनएचएआय’तर्फे अॅड. अनिश कठाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)