वाऱ्याच्या वेगाने लक्झरी कार चालवितो डेकाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:08 IST2021-02-13T04:08:33+5:302021-02-13T04:08:33+5:30
लोकमत विशेष जगदीश जोशी नागपूर : अवैध सावकारीमुळे लहान गुन्हेगारापासून कोट्यवधींची संपत्ती मिळविलेला राकेश डेकाटे वाऱ्याच्या वेगाने लक्झरी कार ...

वाऱ्याच्या वेगाने लक्झरी कार चालवितो डेकाटे
लोकमत विशेष
जगदीश जोशी
नागपूर : अवैध सावकारीमुळे लहान गुन्हेगारापासून कोट्यवधींची संपत्ती मिळविलेला राकेश डेकाटे वाऱ्याच्या वेगाने लक्झरी कार चालवितो. आतापर्यंत एका वकिलाच्या पत्नीसह अनेक नागरिकांना त्याने रस्ते अपघातात ठार केले आहेत. त्याचे अनेक कारनामे पोलिसांकडे दाखल नाहीत. पोलिसांचा दुर्लक्षितपणा आणि काही नेत्यांच्या संरक्षणामुळे तो आतापर्यंत कारवाईपासून बचावला आहे.
गुन्हे शाखेच्या रडारवर आलेला राकेश डेकाटे १५ वर्षांपूर्वी चेन स्नॅचिंग करीत होता. त्यावेळी नागपूर चेन स्नॅचिंगसाठी राज्यासोबत देशभरात चर्चेत होते. चेन स्नॅचिंग करून डेकाटे वेगाने बाईकवर फरार होत होता. त्याच्या वाहनाचा वेग १०० किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक राहत होता. बाईकला नंबरप्लेटही राहत नव्हती. त्यावेळी शहरात सीसीटीव्हीचे जाळे नव्हते. त्यामुळे अनेकदा तो पोलिसांच्या समोरच चेनस्नॅचिंग करून पळून जात होता. त्यावेळी तो किलोच्या हिशेबाने सराफा व्यापाऱ्यांना दागिन्यांची विक्री करीत होता. चेन स्नॅचिंगमध्ये शहर पोलिसांचा ‘मोस्ट वॉंटेड’ झाल्यानंतर डेकाटे गणेश साबणे, नरेश ठाकरे, मदन काळे यांच्या संपर्कात आला. गुन्हेगारी जगतातून पैसे कमविण्यासोबतच डेकाटेला महागड्या लक्झरी वाहनांचा छंद लागला. तो मर्सिडीज, बीएमडब्ल्यूसारख्या लक्झरी गाड्यांमधून फिरू लागला. या वाहनांनाही तो १०० ते १२५ किलोमीटर प्रतितास वेगाने चालवितो. तीन वर्षांपूर्वी मुलीसोबत पायी जात असलेल्या एका तरुण वकिलाच्या पत्नीला त्याने चिरडले होते. हा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद आहे. सूत्रांनुसार, वकिलाच्या पत्नीला चिरडण्यापूर्वी सोनेगावमध्ये सेनेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या रस्ता अपघातात झालेल्या मृत्यूतही डेकाटेचे नाव चर्चेत आले होते. त्यापूर्वी गोवा कॉलनी मार्गावर झालेल्या तीन नागरिकांच्या मृत्यूतही त्याचा हात असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. डेकाटेचा वाहन चालविण्याचा वेग इतका आहे की प्रत्यक्षदर्शींना काहीच समजत नसून ते पाठलागही करू शकत नाहीत. जाणकारांच्या मते डेकाटे टोळी, त्यांच्याशी निगडित नेता व गुडांचा बारकाईने तपास केल्यास शहरातील रस्ते अपघात आणि अनेक गुन्ह्यांची माहिती उघड होऊ शकते. डेकाटे टोळीशी कायदे सल्लागार आणि पोलिसांचे दलालही निगडित आहेत. ते कोणत्याही प्रकरणात ठाण्यात सक्रिय होतात. मनासारखी किंमत मिळत असल्यामुळे डेकाटे टोळीचे काम सहज होते. मोहन दाणीच्या धर्तीवर एका औषध व्यापाऱ्याचे अपहरण करण्याच्या प्रकरणात जमानत मिळविण्यासाठी डेकाटे सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. दिलासा न मिळाल्यामुळे त्याने आत्मसमर्पण केले. काही दिवस तुरुंगात घालविल्यानंतर कोरोनाची लाट आली. कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी गृह विभागाच्या धोरणानुसार काही काळातच त्याची जामिनावर सुटका झाली. बाहेर येताच त्याने दाणी आणि इतर पीडितांना छळणे सुरू केले.
..............
कुटुंबीयांजवळ आहे आर्थिक लेखाजोखा
डेकाटे टोळीतील नरेश ठाकरे अनेक दिवसांपासून फसवणुकीत सक्रिय आहे. शासकीय जमीन आपल्या मालकीची असल्याचे सांगून विक्री केल्याच्या सदर येथील २००८ मधील प्रकरणात त्याचा हात होता. या प्रकरणात तो चार वर्षानंतर पोलिसांच्या हाती लागला होता. तो बनावट कागदपत्रे तयार करण्यात पटाईत आहे. त्यासाठी डेकाटेने त्यास आपल्या टोळीत सामील करून घेतले होते. डेकाटेच्या कृत्यात त्याच्या कुटुंबीयांचाही समावेश असल्याची माहिती आहे. डेकाटेचा आर्थिक व्यवहार तेच सांभाळत होते. त्यामुळे योजनेनुसार डेकाटेने त्यांना गायब केले आहे. त्यांनाच डेकाटेने मिळविलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीची माहिती आहे.
नेता-माजी नगरसेवकाने पळविली बंदूक
गुन्हे शाखेने ६ फेब्रुवारीला डेकाटेला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्वरित या प्रकरणातील नेता आणि माजी नगरसेवकाने एका आरोपीच्या घरून बंदूक, तलवार आणि कार गायब केली. पोलीस तपासात शस्त्र मिळाल्यास नवा गुन्हा दाखल होऊ शकतो अशी त्यांना भीती होती. ‘लोकमत’च्या खुलाशानंतर हा नेता पुरावे नष्ट करण्याच्या कामात लागला आहे. धरमपेठ कॉफी हाऊस चौकात जमा होणारे त्याचे साथीदारही फरार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एका पेट्रोल पंप मालकाकडून वसुली करताना डेकाटेने एका व्यक्तीकडून इनोव्हा कार जबरदस्तीने घेतली होती. इनोव्हाचा वापर पेट्रोल पंपाचा संचालक करीत आहे. त्यानेही अवैध सावकारीच्या कामात डेकाटे टोळीची मदत घेतली आहे.
..............